For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उपनोंदणी कार्यालयाच्या उंबरठ्यावर प्रेमीयुगुलाचे महानाट्या

11:34 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
उपनोंदणी कार्यालयाच्या उंबरठ्यावर प्रेमीयुगुलाचे महानाट्या
Advertisement

कुटुंबीयांनी दिली मुलीच्या कानशिलात, तरीदेखील प्रियकराच्या मिठीतच

Advertisement

बेळगाव : प्रेम होताच थेट विवाह करण्यासाठीच प्रेमीयुगुल उपनोंदणी कार्यालयाचा उंबरठा ओलांडत आहेत. अशाच प्रकारे बुधवारी उपनोंदणी कार्यालयाचा उंबरठा चढलेल्या प्रियकर व प्रेयसीला चांगलाच हिसका मुलीच्या कुटुंबीयांनी दाखवला. मात्र कायद्यासमोर तेही हतबल झाले. मात्र या प्रकारामुळे उपनोंदणी कार्यालयाच्या परिसरात काहीवेळ कुतूहल निर्माण झाले. याचबरोबर चौकशी करण्यासाठी अनेकजण पुढे येऊन त्यानंतर त्याची चवीने चर्चा करण्यात रंगल्याचे चित्र पहायला मिळाले. प्रियकर आणि प्रेयसी घरात कोणतीही कल्पना न देता थेट उपनोंदणी कार्यालयामध्ये नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कायद्यानुसार विवाह योग्य झाल्यानंतर नोंदणी पद्धतीने विवाह केला जातो. मात्र हे सारे कुटुंबीयांपासून लपविण्यात येते. बुधवारी मात्र अशाच प्रकारे लपविलेल्या विवाहाची पोलखोल झाल्याने मुलीच्या नातेवाईकांनी मुलीच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. यावेळी मुलगी जोरजोराने रडून आपल्या प्रियकराला मिठी मारत होती. हा प्रकार पाहून सारेच अवाक् झाले. यामुळे उपनोंदणी कार्यालय परिसरात काहीवेळ गोंधळ उडाला. प्रत्येक जण काय झाले? असा प्रश्न विचारत होते. काहीजण मुलांना लहानाचे मोठे करायचे, त्यानंतर आपल्या वाट्याला असे भोग पाहायचा प्रसंग येत असल्याची चर्चा रंगत होती.

विवाह नोंदणी केलेल्या या प्रेमीयुगुलाला रिक्षातून घराकडे नेऊन त्यांची समजूत काढण्याबाबत प्रयत्न सुरू होता. मात्र उपनोंदणी पद्धतीने झालेला विवाह रद्द कसा करायचा, यासाठी तिच्या नातेवाईकांनी उपनोंदणी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे धाव घेतली. एकदा नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर त्या विवाहाला न्यायालयातून घटस्फोट घेऊनच पूर्णविराम मिळतो. याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना नसल्याने नाहक धावपळ करताना दिसून आली. दुपारी दीडच्या सुमारास उपनोंदणी कार्यालय गजबजलेले असतानाच या दोघांना तो विवाह रद्द करण्यासाठी नातेवाईकांनी उपनोंदणी कार्यालयात आणले. मात्र त्या मुलीने ‘मी त्याच्याशी विवाह करणार म्हणून हट्ट धरला’, त्या तरुणाला बिलगूनच रहात होती. त्यामुळे एका नातेवाईकाचा संयम सुटला आणि तिच्या श्रीमुखात भडकावली. यामुळे त्या मुलीने रडायला सुरुवात केली. यामुळे सारेजण तेथे जमा झाले. नेमके काय झाले? अशी विचारणा ते करत होते. त्यावेळी आम्ही नको म्हणत असताना या मुलाशी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे, असे तिचे कुटुंबीय आणि नातेवाईक सांगत होते.

Advertisement

अन् तिनेही धरला हट्ट

प्रियकर आणि प्रेयसी हे दोघेही कायद्यानुसार विवाहासाठी योग्य वयात होते. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांचे काहीच चालणार नव्हते. तरीदेखील आपल्या मुलीच्या भविष्यासाठी साऱ्यांचीच धडपड चालली होती. प्रेम हे जणू आंधळे असते, हे तिचे नातेवाईक पटवून सांगत होते. मात्र त्या तरुणीचे त्या तरुणावर इतके प्रेम होते की मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही विवाह करणार नाही, असा हट्ट तिने धरला. त्यामुळे एका रिक्षामध्ये त्या दोघांनाही बसविण्यात आले. त्यानंतर घरी नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा रंगली होती.

तरुण-तरुणींचा गेल्या काही वर्षात उपनोंदणी विवाहांचा उच्चांक 

शाळेत असताना काहीजणांचे प्रेम होते. तर काहीजण महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर प्रेम होते. अशा घटना अलीकडे वाढल्या आहेत. प्रेम झाल्यानंतर घरचे विरोध करण्याची शक्यता असते. त्यामुळे हे प्रेमीयुगुल कायद्यानुसार वयात आल्यानंतर थेट उपनोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी पद्धतीने विवाह करताना दिसत आहेत. अशा विवाह नोंदणीच्या संख्येने उच्चांकच गाठल्याचे उपनोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही विवाहासाठी आल्यानंतर त्यांचे वय, तसेच साक्षीदारांची साक्ष घेतो आणि विवाह करतो. आम्हालाही अशा विवाहाला विरोध अशक्य आहे. त्यामुळे नाईलाजास्तव नोंदणी पद्धतीने विवाह झाल्याची कागदोपत्री पूर्तता आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.