पाळणाघरांसाठी ग्रा.पं.ना करावी लागणार आर्थिक तरतूद
सरकारकडून कोट्यावधीच्या निधीची तरतूद : पाळणा घरातील केअर टेकर्सना देणार प्रशिक्षण
बेळगाव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्राम पंचायतींकडून रोजगार हमी योजनेतील कामे सुरू करण्याची मागणी आतापासूनच जोर धरू लागली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घरे निर्माण करण्यात येणार असून यासाठी ग्रामपंचायत, तालुका पंचायत व जिल्हा पंचायतींतून निधी खर्च करण्याची मार्गसूची जारी करण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून कोट्यावधीचा निधी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या तीन वर्षांखालील मुलांसाठी पाळणा घरे निर्माण करण्यात येणार आहेत. या पाळणा घरांसाठी सरकारकडून आर्थिक तरतूद करण्यासाठी मार्गसूची जारी करण्यात आली आहे. ग्राम पंचायतींकडून 70 हजार, ता. पं. कडून 8 हजार व जि. पं. कडून 15 व्या वित्त आयोगातील निधी राखीव ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. पाळणा घरे निर्माण करण्यासाठी ग्रा. पं. कडून 35 हजार रुपये, मूलभूत सुविधा देण्यासाठी 30 हजार रुपये, पाळणा घरातील मुलांच्या मनोरंजनाची खेळणी खरेदीसाठी 5 हजार रुपये अशा प्रकारे 70 हजार रुपयांची तरतूद ग्रा. पं. ला करावी लागणार आहे. तालुका पंचायतकडून स्वयंसेवा संस्थेच्या माध्यमातून पाळणा घरातील केअर टेकर्सना प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक पाळणा घरासाठी 8 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान हा निधी खर्च करावा लागणार आहे.
जि. पं. कडून तयारी
एका केंद्रासाठी जवळपास 1 लाखापेक्षा अधिक निधी खर्च करण्याची तरतूद सरकारने केली आहे. त्यानुसार पाळणा घरे निर्माण करावी लागणार आहेत. पाळणा घरात दाखल होणाऱ्या मुलांसाठी पौष्टिक आहार द्यावा लागणार आहे. पौष्टिक आहार उपलब्ध करण्यासाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. पाळणा घरे निर्माण करण्यासाठी जि. पं. कडून तयारी केली जात आहे. ग्रा. पं. ना याची सूचना करण्यात आली आहे.
राज्यात 4000 पाळणा घरे
राज्य सरकारकडून पाळणा घरांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. जि.पं.च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरात ग्रा. पं. व्याप्तीमध्ये रोजगार हमी योजना कामगारांच्या मुलांसाठी 4000 पाळणा घरे निर्माण करण्याची योजना आखण्यात आली असून यासाठी 160 कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.