ममता सरकारकडून राज्यपालांनी मागविला अहवाल
प्रकरण : संजय रॉयकडून पोलीस आयुक्तांवर आरोप
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय रुग्णालयाच्या महिला डॉक्टरवरील बलात्कार तसेच हत्येप्रकरणी आरोपी संजय रॉयने माजी पोलीस आयुक्तांवर स्वत:ला गोवल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून अहवाल मागविला आहे.
बलात्कार आणि हत्या प्रकरणात मला गोवण्यात आले आहे. कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी माझ्याविरोधात कट रचला आहे. या कटात अन्य वरिष्ठ अधिकारीही सामील असल्याचा दावा संजय रॉयने 11 नोव्हेंबर रोजी केला होता.
या आरोपाची दखल घेत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच सरकारची यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची सूचना त्यांनी केली आहे. ज्युनियर डॉक्टरांच्या मागणीमुळे राज्य सरकारने विनीत गोयल यांना पोलीस आयुक्त पदावरून हटविले होते.
ममता सरकारवरही आरोप
यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी संजय रॉयने ममता बॅनर्जी सरकारवरही आरोप केला होता. ममता सरकार मला याप्रकरणात गोवू पाहत आहे. मला तोंड न उघडण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा संजय रॉयने केला होता.
सीबीआयकडून आरोपपत्र
सीबीआयने स्वत:च्या आरोपपत्रात संजय रॉय हाच मुख्य आरोपी असल्याचे नमूद केले आहे. याचबरोबर महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला नसल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. पीडितेच्या शरीरावर मिळालेल्या सीमेनचा नमुना आणि रक्त हे आरोपीच्या नमुन्याशी मॅच झाल्याचे आरोपपत्रात म्हटले गेले आहे. तर गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेले केस देखील आरोपीचे असल्याचे फॉरेन्सिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. सीबीआयच्या आरोपपत्रात 100 साक्षादारांचे जबाब, 12 पॉलिग्राफ टेस्टचे अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल, मोबाइलचा कॉल डिटेल आणि लोकेशन यासारख्या गोष्टींचा उल्लेख आहे.