25 रुपये प्रतिकिलो दराने सरकार पुरविणार तांदूळ
भारत ब्रँड अंतर्गत देशभरात उपलब्ध होणार : सध्या तांदळाची सरासरी किंमत 43 रुपये प्रतिकिलो
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकार आता भारत ब्रँड अंतर्गत 25 रुपये प्रतिकिलो या दराने तांदूळ विकणार आहे. तांदळाचे वाढलेले भाव नियंत्रित करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकार यापूर्वीच या ब्रँड अंतर्गत आटा आणि डाळींची विक्री करत आहे. देशात सध्या तांदळाची सरासरी किंमत 43 रुपये प्रतिकिलो इतकी आहे.
भारतीय नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड), नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन (एनसीसीइफ) आणि केंद्रीय भांडार आउटलेटच्या माध्यमातून हा तांदूळ विकला जाणार असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.
6 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने 27.50 रुपये प्रतिकिलो या किमतीवर ‘भारत आटा’ लाँच केला होता. तो 10 किलोग्रॅम आणि 30 किलोग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध करविण्यात आला आहे. गव्हाच्या वाढत्या किमतींमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. सध्या देशात आट्याची सरासरी किंमत 35 रुपये प्रतिकिलो इतकी आहे. नोव्हेंबर महिन्यात अन्नधान्याच्या किमती 10.27 टक्क्यांनी वाढल्या होत्या. किरकोळ महागाई दर तीन महिन्यांच्या घसरणीनंतर नोव्हेंबर महिन्यात वाढून 5.55 टक्क्यांवर पोहोचला होता.