जी-20 शिखर बैठकीसंबंधी सर्व एजन्सीना सरकार निर्देश देणार
महापौर रोहित मोन्सेरात यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात होणाऱ्या जी-20 शिखर बैठकीच्या संदर्भात राज्य सरकार सीसीपी सह सर्व एजन्सींना निर्देश जारी करणार आहे, अशी माहिती पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एप्रिलमध्ये होणाऱ्या जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सुरू असलेली सर्व कामे 15 मार्चपर्यंत थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून उर्वरित सर्व बाबींसाठी राज्य सरकारचा नोडल अधिकारी सीसीपीसह सर्व एजन्सींना निर्देश देईल, असे श्री. मोन्सेरात यांनी पुढे सांगितले.
जी-20 शिखर परिषदेच्या तब्बल आठ बैठका गोव्यात होणार असून एवढ्या उच्चस्तरीय बैठका घेणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. त्यासाठी आम्ही तयार होत असून सध्या विविध एजन्सीद्वारे राजधानीत सुरू असलेली विकासकामे 15 मार्चपर्यंत थांबविण्यात येणार आहेत. त्यानंतर शहरातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण हाती घेण्यात येईल. उर्वरित कामे जी20 शिखर परिषदेच्या बैठकी संपल्यानंतर पुन्हा हाती घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.