विधानसभा अधिवेशनात सरकारला घेरणार
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव : विविध प्रश्नांबाबत जाब विचारून नामोहरम करण्याचा इशारा
पणजी : पावसाळी विधानसभा अधिवेशनात पहिल्या दिवसांपासूनच सरकारला विविध विषयांवरून घेरणार व जाब विचारणार, अशी माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली. गोव्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून प्रशासनही डळमळीत झाल्याची टीका आलेमांव यांनी यावेळी केली. त्याच अनुषंगाने सरकारला आणि सत्ताधारी पक्षाला नामोहरम करण्याचा विरोधी पक्षातील आमदारांचा इरादा आहे, असे आलेमांव यांनी नमूद केले.
त्यांनी सांगितले की, राज्याची मेगा हाऊसिंग प्रकल्पाची क्षमता किती आहे, याचा कोणताही अभ्यास न करता वाटेल तसे परवाने त्या प्रकल्पांसाठी देण्यात येत आहेत. त्यासाठी जमिनींची रुपांतरे केली जात आहेत. हे सर्व राज्याच्या भवितव्यासाठी धोकादायक ठरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काँग्रेस आणि आपच्या आमदारांनी एकत्र बैठक घेऊन अधिवेशनासाठी रणनीती निश्चित केली आहे. गोमंतकीय जनतेचे अनेक महत्त्वाचे ज्वलंत विषय शून्य तासाला व लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून काढण्याचे ठरविण्यात आले आहे, असे आलेमांव म्हणाले.
सरदेसाई वेगळ्या मार्गाने विरोधकाची भूमिका बजावणार
गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख तथा आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या पक्षाच्यावतीने प्रश्न मांडले असून त्यात 45 तारांकित आणि 225 अतारांकित प्रश्नांचा समावेश आहे. त्याशिवाय तीन खासगी ठराव, 15 शून्य तासासाठीचे विषय आणि दोन खासगी विधेयके सादर करण्यात येणार आहेत. सरदेसाई हे वेगळया मार्गाने विरोधकाची भूमिका बजावणार असल्याचे दिसून येते.