For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

मुरबाड अंधश्रध्देचा धडा सरकारने घ्यावा!

06:57 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुरबाड अंधश्रध्देचा धडा सरकारने घ्यावा

ठाणे जिह्यातील मुरबाड तालुक्यातील केरवेळे गावात करणी केल्याच्या अंधश्रद्धेतून एका मांत्रिकाने सांगितले म्हणून गावकऱ्यांनी लक्ष्मण भावार्थे या वृद्ध व्यक्तीला निखाऱ्यावरून चालवून जखमी केल्याची अमानवी घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मांत्रिकासह गावकऱ्यांपैकी नऊ लोकांना अटक केली आहे. पण या अटकेनंतर अंधश्रद्धेचे हे प्रकार थांबणार आहेत का? याचा विचार आता राज्य सरकार आणि त्या सरकारातील मंत्री, निद्रिस्त नोकरशाहीने करण्याची गरज आहे. त्यासाठी या मंडळींना हलवून जागे करण्याची जबाबदारी राज्यातील कार्यकर्त्यांनी घेण्याची गरज आहे. सरकारमधील आणि नोकरशाहीतील मंडळीच अनेकदा मांत्रिकांना शरण जात असल्याचे दिसून आले आहे. मंत्र्यांच्या आणि नोकरशहांच्या बोटातील अंगठ्यांमध्ये वेगवेगळ्या रंगाचे खडे त्यांच्यात ठासून भरलेल्या अंधश्रद्धेचे ढळढळीत पुरावे आहेत. तर अशा मंडळींकडून समाजाला अपेक्षा ठेवायची आहे. याच मंडळींपैकी काही जणांनी राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा लागू करण्यात अडथळे निर्माण केले होते. त्यामुळे अशा संवेदनशील विषयावर ते काही संवेदनशीलपणे कृती करतील अशी अपेक्षाच नाही. त्यामुळे राज्यातील जागृत कार्यकर्ते आणि जनता याबाबतीत विचार करेल या अपेक्षेनेच आम्ही हे लिहीत आहोत. अशा घटना रोखायच्या तर त्यासाठी एक व्यापक मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. गावोगाव असणाऱ्या तंटामुक्ती समित्यांच्या जागी समस्या मुक्ती समिती स्थापन करून अशा प्रकारची सामुहिक अंधश्रद्धा समाज का बाळगतो? याचा विचार देणारे आणि लोकांची मानसिकता सुधारणारे कार्यकर्ते अशा समितीमध्ये गावोगाव सक्रिय करणे आवश्यक आहेत. याची आवश्यकता काय? असा विचार सहज येऊ शकतो. गावात मुले पळवणारी टोळी आली आहे असे समजून लोकांनी एकत्र येऊन काही साधूंची हत्या केल्याची घटना याच भागापासून जवळपास घडली होती. त्याचे राजकीय आणि धार्मिक भांडवल खूप झाले. पण, अशी हिंसक कृती समाज विचार न करता कसा काय करू शकतो? अशा कोणत्या समस्यांमुळे समाज विचार करण्याची आपली क्षमता हरवून बसला आहे? याचा अभ्यास होण्याची गरज होती. राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या, मात्र त्यात गुन्हा दाखल करण्याच्या पलीकडे काही घडले नाही. अशात मुरबाडमध्ये पुन्हा अशी सामूहिक हिंसक कृती घडली. यावर केवळ गुन्हे दाखल करणे, हा उपाय नाही. तर मानसशास्त्राचा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा अभ्यास/प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून याची कारणे जाणून घेऊन कृती करण्याची गरज आहे. लोकांच्या समस्या सामाजिक, आर्थिक अशा अनेक प्रकारच्या आहेत. त्यातून बाहेर पडण्याचे त्यांना मार्ग सापडत नाहीत. मग या समस्या सोडवण्यासाठी ते भोंदू बाबा, मांत्रिक, वैदू आणि तशाच प्रकारच्या लोकांकडे धाव घेतात. आपण लोकांच्या समस्या सोडवतो असा आव आणणारे लोक समस्याग्रस्त लोकांच्या मनातील संतापाला भलतीच दिशा देतात. जसे मुरबाडच्या मांत्रिकाने गावातील लोकांना तुमच्या समस्या या वृद्ध व्यक्ती तुमच्यावर करणी करत असल्यामुळे आहेत. त्यामुळे त्यालाच दंड केला पाहिजे. तर तुमची यातून सुटका होईल, असे भासवले. स्वत:ची विचारक्षमता हरवलेल्या गावकऱ्यांनी त्याच्या सांगण्याप्रमाणे अमानवी कृती केली! बरेचदा अशा प्रकारांमध्ये गाव पातळीवरचे राजकारण, व्यक्ती विषयीची असूया, समाजातील अनेक लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले असणे, त्यांचे संशयास्पद वर्तन किंवा संशयीवृत्ती अशातून निर्माण झालेली काळजीविकृती, त्यांना तीव्र नकारात्मक स्वभावाची बनवते. त्यातून अशा कृती घडतात किंवा इतरांना घडवण्यास प्रवृत्त करतात. इथून खरे तर शासन आणि प्रशासनाचे काम सुरू होते. शासन आणि प्रशासन यात सुधारणा घडवण्यात शालेय पातळीपासून सुरुवात करू शकतात. पाचवीपासून पुढे शिकणाऱ्या मुलांना विचारदोष, तर्कदोष म्हणजे काय? याचे ज्ञान दिले पाहिजे. सातवी, आठवीत शिकणाऱ्या मुलांना मानसिक दोषाची माहिती दिली पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षणात असणाऱ्या, सामाजिक संस्था आणि समाजकार्य करणाऱ्या युवकांना मानसिक रोगावर प्रशिक्षण देऊन आसपासच्या व्यक्तींमध्ये असे दोष दिसल्यास त्यांच्या उपचारासाठी प्रयत्न करण्याची उर्मी निर्माण केली पाहिजे. या युवक आणि कार्यकर्त्यांनी ज्या लोकांना प्रशासनापर्यंत पोहोचवले आहे त्यांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारी दवाखान्यात व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. या विषयाचा बराचसा भाग हा गावोगावच्या तंटामुक्ती समितीमध्येही चर्चिला जात असतो. मात्र गावातले सरपंच, पोलीस पाटील सुद्धा अंधश्रद्धेचे बळी ठरणार असतील तर ते अशा घटनांकडे दुर्लक्षच करतील. हे लक्षात घेतले तर तंटामुक्त समित्यांची रचना करताना त्या समस्या मुक्तीच्या समित्या करण्याचीही आवश्यकता आहे. यामध्ये काम करणाऱ्यात कनिष्ठ पातळीवरील शासकीय कर्मचारी, शिक्षक यांना सुद्धा प्रशिक्षण देणे, गावोगावी प्रशिक्षित महाविद्यालयीन युवक, कार्यकर्ते यांचा या समित्यांमध्ये समावेश करून अशा समस्या असणाऱ्या व्यक्तींवर वैद्यकीय उपचारांची आणि सुसंवाद साधण्याची गरज असते, हे या समित्यांना समजावण्याची गरज आहे. गावोगाव अशी व्यवस्था उभारली तर वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांवर मात करून समाजात निर्माण झालेला सामूहिक ताण कमी करता येऊ शकतो. त्यांच्या समस्यांचे मूळ शोधता येते. त्यावर जे काही राजकीय, सामाजिक, आर्थिक उपाय शोधायचे असतील त्याचा विचार गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत करता येऊ शकतो. विदर्भ, मराठवाडा सारख्या भागात शेतकरी आत्महत्यांचा विचार यापूर्वी सरकारने अशा पद्धतीने केला होता. मात्र गावपातळीपासूनची साखळी निर्माण करणे आणि त्यात सक्रिय अशा युवा, कार्यकर्तावर्गाला जोडून घेणे सरकारला जमले नाही. लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना अशा व्यवस्था निर्माण करताना, त्यात प्रश्न विचारतील असे लोक नको असतात. त्यामुळे तळमळीच्या कार्यकर्त्यांअभावी हे प्रयत्न फसतात किंवा आपले उद्दिष्ट गाठण्यापूर्वीच वादग्रस्त बनतात. सतराव्या आणि अठराव्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये असंख्य महिलांना चेटकिणी समजून त्यांना जाळले गेले. त्यानंतर तिथल्या समाजाने त्यावर उत्तर शोधले. अनेकदा विषम आर्थिक परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून निर्माण झालेल्या संतापाला वाट करून देण्याच्या नादात समाज आपला विवेक हरवून बसतो. अशाच पद्धतीचा विवेक हरवलेल्या लोकांनी मुरबाडमध्ये वृद्धाला निखाऱ्यावरून चालायला लावले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.