For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विणकरांच्या मदतीसाठी सरकारने धाव घ्यावी

10:48 AM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
विणकरांच्या मदतीसाठी सरकारने धाव घ्यावी
Advertisement

आमदार शशिकला जोल्ले यांची विधानसभेत मागणी : वस्त्राsद्योग मंत्र्यांकडून आश्वासन

Advertisement

बेळगाव : यंत्रमागांसाठी 10 एचपीपर्यंत मोफत वीजपुरवठा केला जातो. या योजनेतील अंमलबजावणी संबंधीच्या समस्येमुळे विणकरांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. एप्रिल 2023 पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विणकरांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे साखर व वस्त्राsद्योग मंत्री शिवानंद पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी विणकरांच्या समस्यांविषयी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शिवानंद पाटील यांनी, या योजनेबाबत तुम्ही आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असे सांगितले. राज्यातील विणकरांची स्थिती दयनीय आहे. वीजबिल थकले म्हणून त्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. गरीब विणकरांच्या मदतीसाठी सरकारने धाव घ्यावी, अशी मागणी शशिकला जोल्ले यांनी केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, सिद्धू सवदी, प्रभू चव्हाण यांनीही आमदार जोल्ले यांचे समर्थन केले.

विणकरांसाठी नोव्हेंबर 2023 पासून मोफत वीज पुरवठ्याची योजना सुरू आहे. एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंतची बिले आकारली जात आहेत. ती आकारू नयेत, अशी मागणी आहे. सध्या विणकरांच्या वीजबिलापोटी 120 ते 130 कोटी रुपये खर्च केले जात आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2023 पर्यंत बिल माफ करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ही योजना जारी झाल्यापासून बिल माफ झाली आहेत. आधीच्या बिलांच्या माफीसाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करू, असे शिवानंद पाटील यांनी सांगितले. सरकार अस्तित्वात आले त्या दिवशीपासून मोफत वीजपुरवठा योजना लागू करावी, अशी मागणी केली जात आहे. यासाठी अर्थखात्याच्या परवानगीची गरज आहे. निवडणूक जाहीरनाम्यात 10 एचपीपर्यंत विणकरांचे वीजबिल माफ करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. या आश्वासनाची पुर्तता करण्यात आली आहे. 10 ते 20 एचपीपर्यंत सवलतीचे दर 1 रुपया 25 पैसे जाहीर करण्यात आले, असेही शिवानंद पाटील यांनी सांगितले.

Advertisement

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ : शिवानंद पाटील

आमदार शशिकला जोल्ले, सिद्धू सवदी यांनी विणकरांच्या मुद्द्यावर अडून बसताच शिवानंद पाटील यांनी सभागृहातच मुख्यमंत्र्यांना यासंबंधीची माहिती दिली. निम्म्याहून अधिक जणांनी वीजबिले भरली आहेत. केवळ निम्मे विणकर शिल्लक आहेत. आता यामध्ये बदल करून उपयोग होणार नाही. तरीही आधीपासूनच ही योजना लागू करायची असेल तर तुम्हीही या, आपणही येतो. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी करू, असे शिवानंद पाटील यांनी सांगितले. वीजबिले भरली नाहीत म्हणून सध्या वीजजोडण्या तोडण्याचा प्रकार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंबंधी निर्णय होईपर्यंत विणकरांच्या वीजजोडण्या तोडू नयेत, अशी मागणी आमदार शशिकला जोल्ले व सिद्धू सवदी यांनी केली. राज्यातील हातमाग व यंत्रमागांविषयी शिवानंद पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Advertisement
Tags :

.