50 खोके वाल्यांचे सरकार जाणार
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे : महाराष्ट्रात सक्षम, स्थिर मविआचे सरकार येणार
कोल्हापूर :
पन्नास खोके एकदम ओके... वाले महायुतीचे सरकार आता सत्तेतून पाय उतार होईल. महाराष्ट्रात एक सक्षम आणि स्थिर सरकार देऊ. असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला आहे. ते रविवारी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
खर्गे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरलो आहे. या ठिकाणी जनतेचा महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुती सरकारला जनता कंटाळली आहे. भाजपला हरवण्यासाठी आम्ही एक झालो आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार बनवताना कोणतीही अडचण येणार नाही. आमच्या पक्षात येथून पुढे कोणताही घोडेबाजार होणार नाही. मजबुत लोकांनाच उमेदवारी दिली आहे. ते कुठेही जाणार नाहीत, असा विश्वासही खर्गे यांनी व्यक्त केला आहे.
मात्र, उत्तर प्रदेशमधील रुग्णालयात लहान मुलांचा मृत्यू होत आहे. मणिपूरमध्ये लोकांना मारले जात आहे. अत्याचार होत आहे. लहान मुले देखील त्या ठिकाणी मृत्यू होत आहेत. याबाबत ते काहीच उत्तर देत नाही. या उलट महाराष्ट्राच्या निवडणूकीसाठी फिरत आहेत. आम्ही देखील, खूप निवडणुका पाहिल्या आहेत. मात्र, या ठिकाणी पंतप्रधान आले, केंद्रीय गृहमंत्री आले. ही निवडणूक महाराष्ट्र राज्यातील आहे. या ठिकाणची जनता या ठिकाणचा निर्णय घेईल. मात्र राज्य स्तरावरील निवडणुकासाठी आम्ही कधी गेलो नाही. ते एकडे आल्याने आम्हाला यावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशावर प्रेम नाही. जनतेचे देशाचे काहीतरी भले करण्यासाठी तुम्हाला निवडले आहे. मात्र पंतप्रधान सत्ता वाचवण्यासाठी आता तालुका पातळीवर देखील जात आहेत. बटेंगे ते बचेंगे, एक है तो सेफ असे प्रचार करत आहेत.
आतापर्यंत असा कोणतेही प्रधानमंत्री प्रचारासाठी फिरलेले नाहीत. पंतप्रधान मोदींची खुर्ची, सुरक्षित नाही. लोकसभेत त्यांना कमी जागामिळाल्या. केंद्रातील सरकार स्थिर नसल्याचा दावाही खर्गे यांनी केला. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, कर्नाटकचे आमदार हसन मौलाना, माजी आमदार अंजली निंबाळकर, कोल्हापूर उत्तर विधानसभेचे निरीक्षक सुखविंदर ब्रार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक तोफिक मुल्लानी, बाळासाहेब सरनाईक, संध्या घोटणे, सरलाताई पाटील, भारती पोवार आदी उपस्थित होते.
निकालानंतर सर्व मिळून मुख्यमंत्री ठरविणार
मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनही निश्चित नाही. प्रचारासाठी थोडाच वेळ शिल्लक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर आता बोलने योग्य होणार नाही. महाविकास आघाडीतील सर्व नेते मिळून यावर निर्णय घेतील, असे खर्गे यांनी सांगितले.