मोगरी, जायांबद्दल सरकार उदासीन!
जतन, संरक्षणासाठी कोणतीही योजना नाही : व्यवसाय इतिहासजमा होण्याची भीती
पणजी : शिरगांवच्या श्रीलईराईला मोगरी तर म्हार्दोळच्या श्रीम्हाळशेला जायो, ही फुले अती प्रिय असल्याचे सर्वश्रूत आहे. ही फुले म्हणजे गोव्याचे वैशिष्ट्या. अन्य राज्यात सहजा ती सापडत नाहीत. त्यामुळे त्यांचे जतन संरक्षण होणे अत्यावश्यक आहे. परंतु राज्य सरकारला त्यांचा विसर पडला असून या फुलांपेक्षा झेंडू फुलांना जास्त महत्व देण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार सध्या राज्यात तब्बल 2 कोटी ऊपये किंमतीची झेंडू फुलांचे उत्पादन होत आहे तर जायो, मोगरी ही फुले इतिहासजमा होण्याच्या मार्गावर पोहोचली आहेत. जायांचे मळेवाले कसेबसे तग धरुन आहेत. अशावेळी त्या फुलांच्या जतन, संरक्षणासाठी अद्याप सरकारने कोणतीही विशेष योजना राबविलेली नाही, अशी माहिती गोवा विधानसभेत कृषी खात्याशी संबंधित विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर देण्यात आली आहे. या संदर्भात आमदार विजय सरदेसाई यांनी प्रश्न उपस्थित केला होता तर आमदार विरेश बोरकर यांनी प्रत्यक्ष जायांची फुलेच विधानसभेत आणून त्यांच्या अस्तित्वाचे महत्व सभागृहाला पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.
म्हार्दोळ हा भाग एकेकाळी जायांच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध होता. या फुलांचे उत्पादन घेणारे तेथील मळेकर वैभवसंपन्न जीवन जगत होते. मात्र नंतरच्या काळात भाटकारांकडून त्रास देण्यात येऊ लागले. कारण या जमिनी त्यांनी तोंडी करारावर वापरण्यास घेतलेल्या असतात. त्यामुळे दरवर्षी करार नूतनीकरण करताना त्यांना बरेच त्रास सहन करावे लागतात. तशातच काही मळेकरांची पुढील पिढी हा व्यवसाय पुढे नेण्यात स्वारस्य दाखवत नाहीत. परिणामी तो इतिहासजमा होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, सदर प्रश्नावर दिलेल्या उत्तरात कृषीमंत्र्यांनी सदर मळेकर हे हंगामी तत्वावर हे मळे करत असले तरी ‘काळजीवाहक’ श्रेणी अंतर्गत ते ‘कृषी कार्ड’ मिळविण्यास पात्र असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एखादवेळी त्यांच्या पिकांचे नुकसान वगैरे झाल्यास ‘आधार निधी’ योजनेअंतर्गत त्यांना मदतही मिळू शकते, असे म्हटले आहे. त्याशिवाय फुले उत्पादकांना अधिक पाठिंबा देण्यासाठी कृषी संचालनालयाने गावपातळीवर ‘ई-कृषी संपर्क’ नावाने ‘व्हाट्सअॅप’ ग्रुप उपक्रमही सुरू केला असून ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेशी हा प्रयत्न सुसंगत असल्याचे म्हटले आहे.