वस्तू प्रदर्शन-विक्री मेळाव्याचे थाटात उद्घाटन
प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्तीनिमित्त बेळगाव शहरात गुरुवार दि. 26 पासून विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. येथील सरदार्स मैदानावर सूत आणि खादी उत्पादने वस्तू प्रदर्शन व विक्री मेळावा भरविण्यात आला आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते झाले. यानंतर सरदार्स हायस्कूल मैदानावर उभयतांचे आगमन झाले. कौशल्य विकास-उपजीविका खात्याचे मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील व अन्य मान्यवरांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
काँग्रेस अधिवेशन शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष मंत्री एच. के. पाटील, मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा, के. एच. मुनियप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, एम. बी. पाटील, डॉ. एम. सी. सुधाकर, दिनेश गुंडूराव, भैरती सुरेश, आमदार आर. व्ही. देशपांडे, राज्य सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी टी. बी. जयचंद्र, माजी मुख्यमंत्री एम. वीराप्पा मोईली आदी उपस्थित होते.
सरदार्स हायस्कूल मैदानावर स्व-साहाय्य गटांच्या महिलांनी बनविलेली उत्पादने तसेच खादी उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा भरविण्यात आला असून ‘अस्मिते व्यापार मेळ-2024’ या नावाने मेळावा सुरू आहे. यामध्ये विविध जिल्ह्यातील स्व-साहाय्य गटातील महिलांनी आपली उत्पादने स्टॉलवर मांडली आहेत. मेळाव्यामध्ये एकूण 150 स्टॉल असून 10 खाद्यपदार्थांचे स्टॉल, 50 खादी उत्पादनांचे स्टॉल आहेत. मेळाव्यात सर्वांना मोफत प्रवेश असून 4 जानेवारीपर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 9.30 पर्यंत वस्तू-प्रदर्शन विक्री मेळावा सुरू राहणार आहे. बेळगाव शहरात यंदा चौथ्यांदा अशा प्रकारचा मेळावा भरविण्यात आला असून याला प्रतिसाद मिळत आहे.