रेपोदर कपातीची आनंदवार्ता
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी रेपो दराबाबत पुढील बैठकीत कपातीबाबत वक्तव्य केल्याने त्याबाबत बांधकाम व्यवसायिकांमध्ये समाधानाची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. गृहकर्जदारांमध्ये याने उत्साह संचारला नसता तर नवल होते. शक्तीकांत दास यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये पाव टक्का म्हणजेच 25 बेसीस पॉईंटस्ने रेपो दर कमी केला जाणार असल्याचे वक्तव्य केले. ऐन दिवाळीत ही आनंदवार्ता गव्हर्नर साहेबांनी तमाम घर खरेदीदार, गृहकर्जदार यांना दिली आहे. सध्याला रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 6.50 टक्के इतका आहे. डिसेंबरमध्ये पाव टक्का कपात केल्यानंतर 6.25 टक्के इतका रेपो दर राहणार आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ऐन दिवाळीत घर खरेदीदारांना तसेच गृहकर्ज घेणाऱ्यांना दिलासादायी बातमी देत त्यांची दिवाळी आणखी गोड केली आहे. गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकांमध्ये रेपोदर जैसे थे ठेवण्यात आला होता. 2024 च्या सुरुवातीपासूनच व्याजदर कपातीबाबत बांधकाम व्यावसायिकांसह घर खरेदीदारांकडून आशा व्यक्त केली जात होती. ऑगस्ट किंवा ऑक्टोबरच्या बैठकीमध्ये रेपोदरात कपात होणार, असा अंदाज वर्तविला गेला होता. परंतु या दरम्यानच्या काळात जागतिक भू राजकीय स्थिती अस्थिर राहिल्याने त्याचबरोबर महागाईचाही विचार करुन या मागच्या दोन बैठकांमध्ये शक्तीकांत दास यांनी रेपोदर जैसे थे ठेवणेच रास्त मानत रेपो रेट जैसे थे ठेवला होता. गुरुवारच्या वक्तव्याआधी काही दिवसांपूर्वी शक्तीकांत दास यांनी महागाईचा विचार करता तातडीने व्याजदर कमी करणे अधिक जोखमीचे असणार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी काहीशी निराशा खरेदीदारांमध्ये होती. पण आता नव्या वक्तव्याने पुन्हा आशा वाढल्या आहेत. भारताची अर्थव्यवस्था जरी सध्याला योग्य दिशेने मार्गक्रमण करीत असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय अस्थिरता त्याचप्रमाणे भारतातील खराब हवामानामुळे होणारे नुकसान या सर्व गोष्टींचा विचार करुन रेपोदराबाबत निर्णय घेतला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पुढील डिसेंबरच्या बैठकीमध्ये रेपोदरात कपात केली जाण्याचे संकेत वर्तविल्याने बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदीदारांना याचा मोठा दिलासा भविष्यकाळामध्ये मिळणार आहे. डिसेंबरमध्ये कपात करण्यापूर्वी त्यावेळी देशाची महागाई कितपत असेल हे देखील पाहिले जाणार असल्याचे त्यांनी म्हणून ठेवले आहे. सप्टेंबरमध्ये महागाई 5.9 टक्क्यांवर वाढली होती. सध्याच्या तिमाहीत ती 4.9 टक्क्यांपर्यंत खाली येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 2019 पासून पाहता सध्याला असणारे गृहकर्ज व्याजदर हे सर्वोच्च पातळीवर आहेत. महागाई आणि विकास यांच्यात ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगत पुढील तिमाहीमध्ये महागाई कमी करण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. या महागाई कमी होण्याच्या भविष्यकालीन शक्यतेनुसारच शक्तीकांत दास यांनी डिसेंबरमध्ये होणाऱ्या पतधोरण समितीच्या द्विमासिक बैठकीमध्ये रेपोदरात कपातीचे संकेत दिले आहेत. तेंव्हा आता घर खरेदीदार आणि गृहकर्जदार यांचे डिसेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीकडे लक्ष असेल. अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केली होती. त्यानंतर भारतातही व्याजदरात कपात होणार, याबाबतच्या आशा अधिक वाढल्या होत्या. त्यामुळे अनेकांचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास कोणता निर्णय घेतात हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 57 अर्थतज्ञांपैकी 30 जणांना पुढील बैठकीत पावटक्का रेपोदरात कपात होण्याची शक्यता वाटते आहे. भारत आर्थिक विकासात आघाडीवर असूनही चालु आर्थिक वर्षामध्ये विकासदरामध्ये काहीशी घसरण राहणार असल्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. पुढील आर्थिक वर्षात विकास दर 6.7 टक्क्यांच्या आसपास राहण्याचेही संकेत व्यक्त केले गेले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 8.2 टक्के विकास दर होता. त्या तुलनेत विकास दरात घट अनुभवयाला मिळण्याची शक्यता आहे.