इजिप्तच्या वाळवंटात दबलेले सोन्याचे शहर
पुरातत्व तज्ञांनी शोधून काढला याचा खजिना
इजिप्तची भूमी जगभरातील पुरातत्व तज्ञांना आकर्षित करत असते. हजारो वर्षे जुन्या संस्कृतीचे केंद्र राहिलेला हा देश आजही स्वत:मध्ये असंख्य रहस्य सामावून आहे. इजिप्तच्या भूमीत असलेल्या एका अशाच रहस्याची उकल पुरातत्वतज्ञांनी केली आहे. इजिप्तमध्ये 3000 वर्षे जुन्या हरवून गेलेल्या सोन्याच्या शहराचा शोध लावण्यात आला आहे. अनेक वर्षांच्या काळजीपूर्वक उत्खननानंतर आता याचा पुनरुद्धार पूर्ण करण्यात आला.
इजिप्तच्या वैज्ञानिकांनी 2021 मध्ये याचा शोध लावला होता, याला ‘हरवलेले सोनेरी शहर’ असे संबोधिले जायचे. इजिप्तच्या लाल समुद्राच्या गवर्नरेटमध्ये मार्सा आलमच्या दक्षिण-पश्चिमेस स्थित जबल सुकरीचे स्थळ ख्रिस्तपूर्व 1000 साली औद्योगिक घडामोडींचे केंद्र होते. या स्थळाने सोन्याचे खनन आणि त्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती असे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या शहरा सोने बाहेर काढण्यासाठी संरचना डिझाइन करण्यात आल्या होत्या.
सोन्यावर प्रक्रिया करणारे स्थळ
पुरातत्व तज्ञांनी या ठिकाणाला अलिकडच्या वर्षांमध्ये सर्वात मोठ्या पुरातात्विक शोध ठरविले आहे. इजिप्तच्या सुप्रीम कौन्सिल ऑफ एंटिक्विटीजचे महासचिव डॉ. मोहम्मद इस्माइल खालिद यांनी उत्खननात सोन्याच्या प्रक्रियास्थळाचे अवशेष मिळाल्याचे सांगत यात फिल्टरेशन बेसिन आणि सोने वितळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मातीच्या भट्ट्या सामील असल्याची माहिती दिली. हे ठिकाण इजिप्तच्या प्राचीन सोन्याच्या व्यापाराचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा होते असे समोर आले आहे.
टॉलमी काळातील नाणी
या ठिकाणी टॉलमी काळातील नाणीही सापडली आहेत. हे ठिकाण नव्या साम्राज्याच्या प्रारंभिक खनन कार्यांनंतरही दीर्घकाळापर्यंत सक्रीय राहिल्याचे यातून स्पष्ट होते. उत्खनन प्राचीन इजिप्तच्या खनिकांच्या इंजिनियरिंग आणि तांत्रिक प्रावीण्यतेवर प्रकाश टाकतो, त्या काळात वाळवंटी भागात सोने मिळविण्यासाठी पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या असे इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन अवशेष मंत्री शेरिफ फथी यांनी सांगितले आहे.
इजिप्तच्या लोकांनी क्वार्ट्जपासून सोने वेगळे करण्याच्या प्रक्रियेत प्रावीण्य मिळविले होते. सोने वितळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मातीच्या भट्ट्यांच्या शोधातून हे स्थळ पूर्णपणे संचालित प्रक्रिया केंद्र होते याची पुष्टी मिळत असल्याचे डॉ. खालिद यांनी म्हटले आहे.