महाराष्ट्राच्या पूजा दानोळेची सुवर्णभरारी
सायकलिंगमध्ये कोल्हापूरमधील पैलवानाच्या कन्येचे यश : वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या संकेत सरगर, दीपाली गुरसाळे यांना रौप्य
वृत्तसंस्था/डेहराडून
उत्तराखंडातील 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सुवर्णपदक पटकावून आपल्या लौकिकला साजेशी कामगिरी केली. घरची पार्श्वभूमी पैलवानांची असली तरीही महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने सायकलिंग मध्ये करिअर करताना 30 किलोमीटर टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध करून दिवस गाजविला. डोंगरदऱ्यातील रुद्रपूरमधील सायकलिंगच्या टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात तिने 30 किलोमीटरचे अंतर 45 मिनिटे व 30.374 सेकंदात पार करीत सोनेरी यशाला गवसणी घातली. टाईम ट्रायल म्हणजे पूजा असेच समीकरण सायकलिंगमध्ये मानले जाते. कोल्हापूर जिह्यातील इंगळी या गावातील खेळाडू पूजा हिने आजपर्यंत मुलींच्या 14, 16 व 18 वर्षाखालील गटात तसेच वरिष्ठ महिलांच्या गटात याच क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सातत्याने सुवर्ण पदकांचीच कमाई केली आहे. आजही तिने सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत वेळ व वेग या दृष्टीने योग्य नियोजन केले होते. त्यामुळेच तिला येथे पुन्हा विजेतेपदाचा मान मिळाला.
पूजा हिचे वडील बबन व भाऊ हर्षद हे दोघेही नामवंत कुस्तीगीर आहेत. मात्र तिला फारशी कुस्तीची आवड नव्हती. सुरुवातीला तिने ट्रायथलॉनमध्ये करिअर करण्याचे ठरविले होते मात्र घरच्यांच्या आग्रहाखातर तिने सायकलिंगमध्ये करिअर सुरू केले. 2016 मध्ये तिने ज्येष्ठ प्रशिक्षक दीपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंगचे प्राथमिक ज्ञान आत्मसात केले. त्यानंतर तिने मिळवलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमधील यश पाहून भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या नवी दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रात तिची निवड झाली. तिला तेथे अनिल कुमार यांचे मार्गदर्शन मिळत आहे. आजपर्यंत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहेत. ती इचलकरंजी येथील न्यू इंग्लिश स्कूल खंजिरे शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षाला आहे. उत्तराखंडातील 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी ट्रायथलॉनमध्ये 2 सुवर्णपदके जिंकून महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली होती. 3 सुवर्णपदकांसह महाराष्ट्र मणिपूर, हरियाणा पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राचा पदकांचा षटकार, 4 रौप्य, 2 कांस्य
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ग्रामिण भागातील ध्येयवादी खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रासाठी 6 पदकांची लयलुट केली. सांगलीचा राष्ट्रकुल पदक विजेता संकेत सरगर, सांगलीची दीपाली गुरसाळे, पुण्याच्या सारिका शिनगारे व नाशिकच्या मुकुंद आहेरने रूपेरी यशाचे वजन पेलले. लातूरच्या आकाश गौड व पुण्याचा शुभम तोडकर यांनी कांस्य पदकाची कमाई केली. पंधरा दिवसांपूर्वी गुडघ्याला व स्नायूला मोठ्या प्रमाणात दुखापती होऊनही सांगली जिह्याची खेळाडू दीपाली गुरसाळे हिने या दुखापतीवर मात करीत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकाविले. दीपाली हिने 45 किलो गटातील स्नॅचमध्ये 69 किलो तर क्लीन व जर्क मध्ये 82 किलो असे एकूण 151 किलो वचन उचलले. केरळच्या सुफना जस्मिन हिने अनुक्रमे 72 व 87 असे एकूण 159 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले.
पुरुषांच्या 61 किलो गटात महाराष्ट्राच्या सांगलीचा राष्टकुल पदक विजेता संकेत सरगर याने स्नॅचमध्ये 117 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 142 किलो असे एकूण 259 किलो वजन उचलले आणि रौप्य पदक जिंकले. त्याचाच सहकारी पुण्याचा शुभम तोडकर याने कांस्यपदक पटकाविले. त्याने स्नॅच मध्ये 114 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 140 किलो असे एकूण 254 किलो वजन उचलले. राष्टकुल स्पर्धेत हुकलेले सुवर्णपदक आता जिंकयचे असल्याचे संकेत सरगरने सांगितले.
पुरुष गटातील 55 किलो गटात महाराष्ट्राच्या मुकुंद आहेर व आकाश गौड यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. मुकुंद आहेर याने स्नॅचमध्ये 112 किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये 135 असे एकूण 247 किलो वजन उचलले. आकाश गौड याने स्नॅचमध्ये 107 किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये 137 असे एकूण 244 किलो वजन उचलले. पुण्याजवळील राजगुरूनगरमधील सारिका शिनगारे हिने महिलांच्या 49 किलो गटात रुपेरी यश संपादन केले. तिने स्नॅचमध्ये 79 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 100 असे एकूण 179 किलो वजन उचलले. छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादव हिने अनुक्रमे 85 व 106 असे एकूण 191 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे.
महिलांच्या 45 किलो गटातील दीपाली हिने गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्नॅचमध्ये 75 किलो व एकूणचा 164 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. यंदाही तिला राष्ट्रीय विक्रमाची अपेक्षा होती मात्र पंधरा दिवसांपूर्वी सराव करताना तिच्या गुडघ्याला आणि स्नायूंची मोठी दुखापत झाली. त्यामुळे आपली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संधी मुकणार की काय, अशी शंका तिला निर्माण झाली मात्र तिचे प्रशिक्षक संतोष सिंहासने यांनी तिला मानसिक आधार दिला. त्यामुळे तिने पंधरा दिवस जमेल तसा सराव करीत येथील स्पर्धेत भाग घेतला आणि महाराष्ट्राला आणखी एक रौप्यपदकाची कमाई करून दिली.
संयमाच्या जोरावर आर्याचे रूपेरी यश, नेमबाजीत महाराष्ट्राचे उघडले खाते
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या आर्या बोरसे अपेक्षेप्रमाणे रूपेरी यशाचा नेम साधून नेमबाजीतील महाराष्ट्राच्या पदकाचे खाते उघडले. संयम व चिकाटी दाखवली की यश हमखास मिळते असे आपण नेहमी म्हणतो हा प्रत्यय आर्या बोरसे हिच्याबाबत आज येथे दिसून आला. नेमबाजीमधील मधल्या टप्प्यात पिछाडीवर असलेल्या आर्या हिने शेवटच्या टप्प्यात अचूक नेम साधला आणि महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पदक खेचून आणले. महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशुल शूटिंग रेंजवर आर्या बोरसेने 252.5 गुणांची कमाई करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच पदकाला गवसणी घातली. सुवर्णपदक जिंकणाऱ्या आर नर्मदा या तामिळनाडूच्या खेळाडूने 254.4 गुणांची नोंद केली. पात्रता फेरीत आर्याने दुसरे स्थान घेत अंतिम फेरीसाठी प्रवेश निश्चित केला होता. पहिल्या टप्प्यात तिने अन्य दोन खेळाडू समवेत आघाडी घेतली होती. मात्र अठराव्या नेमच्या वेळी ती चौथ्या स्थानावर होती. त्यावेळी तिला पदक मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती तथापि तिने शेवटच्या चार नेममध्ये अतिशय संयम आणि आत्मविश्वास दाखवीत पदक खेचून आणले. आर्या ही 22 वर्षीय खेळाडू सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या खेलो इंडिया शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ती नाशिकची असून तेथे एचपीटी महाविद्यालयात कला शाखेत ती शिकत आहे.
रुद्रांक्ष पाटील व पार्थ माने अंतिम फेरीत
महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय खेळाडू रूद्रांक्ष पाटील व पार्थ माने यांनी पुरुषांच्या दहा मीटर्स एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक फेरीत पाटील याने 633.8 गुणांसह अव्वल स्थान घेतले आहे तर पार्थ हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याचे 632.6 गुण झाले आहेत.
जलतरणामध्ये महाराष्ट्राचा पदकांचा चौकार, सान्वी देशवालचे सोनेरी यश
उत्तराखंडात सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरणामध्ये सलग दुसर्या दिवशी पदकांचा चौकार झळकविला. सान्वी देशवालचे सोनेरी यश संपादले. चार बाय शंभर मीटर मिडले रिले शर्यतीमधील पुऊष गटात कांस्य तर महिला गटात रौप्यपदक मिळाले तर महिलांच्या डायव्हिंगमध्ये ईशा वाघमोडे हिने रौप्य पदक जिंकले सान्वी देशवाल हिने 4 बाय 100 मीटर्स वैयक्तिक मिडले प्रकारात सोनेरी यश संपादन केले. तिला ही शर्यत पूर्ण करण्यास पाच मिनिटे 5.49 सेकंद वेळ लागला. पुऊषांच्या विभागात चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत कास्यपदक मिळवताना महाराष्ट्राच्या संघात ऋषभ दास, पृथ्वीराज डांगे, मिहीर आम्ब्रे, हीर गितेश शहा यांचा समावेश होता. त्यांनी हे अंतर पार करण्यास तीन मिनिटे 48.31 सेकंद वेळ लागला महिलांच्या 4 बाय 100 मीटर्स मिडले रिले शर्यतीत महाराष्ट्राला ऊपेरी यश लाभले. ऋजुता राजाज्ञ, ज्योती पाटील, प्रतिष्ठा डांगी व आदिती हेगडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने ही शर्यत चार मिनिटे 31.29 सेकंदात पार केली. मुलींच्या दहा मीटर प्लॅटफॉर्म ड्रायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या ईशा वाघमोडे हिला रौप्य पदक मिळाले. तिने या प्रकारात 175.50 गुणांची नोंद केली.