झाडाचे वैभव...
माझ्या आजोळी गावाच्या वेशीवर एक सुंदर डेरेदार वडाचं झाड होतं. आमचं गाव जवळ आलं हे त्या झाडावरून लक्षात यायचे. या झाडावरती किलबिलणारे पक्षी, सावलीला बसलेली गुरें, माणसे, झाडाच्या लोंबणाऱ्या पारंब्या सगळंच काही मनाला आकर्षून घेणारं, हे झाड म्हणजे एक छोटंसं गावच वाटायचं. त्यामुळे या झाडावरती प्राण्यांना देखील सारखं यावंसं वाटायचं. कधी मोर, पोपट यायचे तर कधी चिमण्या, कावळे असायचे. खारुताई तर सतत खेळत असायची. माकडंसुद्धा अधूनमधून हजेरी लावून जायचे. या सगळ्याचा त्या झाडाला खूप अभिमान झाला. आता ते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्राणी पक्षाला तिथे रागावून बोलू लागले. फटकारू लागले. त्याला वाटायचं हे सगळं माझ्या मालकीचे असताना हे बाकीचे का येतात? त्याच्या त्या बोलण्यामुळे आणि रागावल्यामुळे सगळे प्राणी, पक्षी त्याच्यापासून चार हात लांब राहू लागले. आसपासच्या झाडांवर जाऊ लागले. या झाडाखाली बसणारी गाई, गुरंसुद्धा आता येईनाशी झाली होती. माणसं सुद्धा लांबून वळसा घालून जायला लागले. त्यामुळे या झाडावर बसल्यानंतर जी काही फळं खाली पडायची, जी काही पानं पडायची, त्याच्यामुळे जमिनीवर राहणाऱ्यांना सुद्धा कीटकांची सोय व्हायची. पण आता प्राणी पक्षीच येत नसल्यामुळे हे सगळं आपोआप थांबलं होतं. त्याच्यामुळे खालचे प्राणी, पक्षी, कीटकसुद्धा दुसऱ्या झाडांकडे वळले होते. या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. हे झाड हळूहळू सुकायला लागले. त्याच्या फांद्या पर्णहीन झाल्या. हे सगळं ते पाहिल्यानंतर शेजारच्या झाडाने त्याला विचारलं अरे तुला काय होतंय? त्याच्या काही लक्षात येईना. तो म्हणाला, बहुतेक माझी शेवटची घटका जवळ आली असावी. त्यावर शेजारच्या झाडांनी समजावलं, तू आता एक काम कर, तुझा स्वभाव बदल. तुझं वागणं बदल. म्हणजे तुझं तुलाच कळेल, आपलं काय चुकलं ते. झाड बरं म्हणालं. आता शांत बसून राहणाऱ्या झाडावरती कधीतरी मधून मधून चिमणी, कावळे येऊ लागले. तसतशी झाडाला पानं येऊ लागली. पोपटसुद्धा फळं खायला येऊ लागले, माकडे येऊन फाद्यांना झोंबू लागले आणि एखादी फांदी तुटली तरीही झाडांनी कुठली तक्रार केली नाही आणि मग झाडाच्या लक्षात आलं की आपण या सगळ्यांमुळे जास्त फळतोय, फुलतोय. त्याच्याशिवाय आपण वाढू शकणार नाही आणि सगळे मिळून एकत्र राहिलो तरंच आपला विकास पुढे आहे, हे सगळं लक्षात आल्यानंतर आता झाडांनी आपल्या स्वभावात बदल केला होता. आपलं रागावणं बोलणं बंद करून टाकलं होतं आणि सगळ्या पक्षांच्या सहवासात आनंदात हे झाड जगू लागलं आणि पुन्हा तरारून आलं.