कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय क्रिकेटचं ‘वैभव’ !

06:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘आयपीएल’च्या सुरुवातीपासून ‘राजस्थान रॉयल्स’च्या भात्यातील वैभव सूर्यवंशी या खेळाडूला कधी संधी मिळते अन् तो काय प्रताप गाजवितो याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती ती त्याच्या वयामुळं...अवघ्या 14 वर्षांच्या या बिहारी खेळाडूनं पहिले तीन सामने होईपर्यंतच केलेली कामगिरी ही त्या अपेक्षांच्या पल्याड जाणारी, अनेक विक्रमांचा चक्काचूर करणारी आणि त्याच्यात दडलेली अफलातून क्षमता पुरेपूर दाखवून देणारी...

Advertisement

‘त्याच्या’ सगळ्याच गोष्टी इतिहास घडविणाऱ्या...‘त्यानं’ ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केलं तेव्हा ‘तो’ बनला स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत लहान खेळाडू...त्यानंतर ‘त्यानं’ वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला आपल्या ‘आयपीएल’ कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर सणसणीत षटकार खेचून सर्वांना गार पाडलं. हा देखील एक विक्रमच...त्या पहिल्या डावात ‘त्यानं’ 20 चेंडूंत काढलेल्या 34 धावा या पुढं कुठलं वादळ भिरभिरत येणार त्याचे संकेत होते...अन् मग सोमवारी तिसऱ्याच ‘आयपीएल’ सामन्यात ‘त्यानं’ इतिहासाच्या पुस्तकाची पानं पुन्हा लिहिण्यास भाग पाडलं ते फक्त 35 चेंडूंत स्फोटक शतकी खेळी करत...‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये एखाद्या भारतीयानं झळकावलेलं हे सर्वांत जलद शतक. शिवाय ‘टी-20’ क्रिकेटच्या विश्वात असा प्रताप गाजविणारा ‘तो’ सर्वांत तऊण खेळाडू...फक्त 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी...

Advertisement

बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी असलेला वैभव जन्मला तो ‘आयपीएल’ सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी. लीगच्या वाटचालीपेक्षा कमी वयाचा तो पहिला शतकवीर...2011 मध्ये जेव्हा महेंद्रसिंह धोनीच्या एका जबरदस्त षटकारानं एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक भारताला मिळवून दिला तेव्हा तो अवघ्या सहा दिवसांचा...त्याच्या शतकी खेळीनंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका यांना 2017 साली वैभव स्टेडियममध्ये बसून आपला त्यावेळचा आवडीचा संघ रायझिंग पुणे सुपरजायंट्सला कसा पाठिंबा देत होता त्याचं छायाचित्र ‘शेअर’ केल्याशिवाय राहवलं नाही. त्यावेळी तो सहा वर्षांचा...सुऊवातीपासूनच वैभव सूर्यवंशी एकामागून एक विक्रम मोडत आलाय...

‘तुम्ही पहिल्याच चेंडूवर षटकार खेचलाय असं कधी घडलंय का ?’...वैभवनं ‘आयपीएल’मध्ये पदार्पण करण्याच्या काही दिवस पूर्वी एका सहकाऱ्याला निरागसपणे विचारलेला अन् काहीसा अचंबित करणारा सवाल...त्यानंतर लगेच झाला तो राजस्थान रॉयल्सचा लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना. या 14 वर्षांच्या पठ्ठ्यानं शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत आपल्या आगमनाची दणकेबाज पद्धतीनं घोषणा केली आणि त्यानंतर आवेश खानलाही असाच प्रसाद मिळाला...

परंतु वैभव सूर्यवंशीसाठी पहिल्याच चेंडूला सीमापार पिटाळणं हे काही नवीन नाही...‘माझ्यासाठी ती नेहमीची बाब. मी भारतासाठी 19 वर्षांखालील संघातून खेळलोय. तिथं आणि स्थानिक पातळीवरही मी पहिल्याच चेंडूवर षटकार खेचलेत. पहिले 10 चेंडू खेळून काढण्याचा दबाव माझ्यावर मुळीच नव्हता. मी ठरविलं होतं की, जर चेंडू माझ्या रडारवर आला, तर तो फटकावल्याशिवाय राहायचं नाही’, तो सांगतो...‘मी त्यावेळी हा माझा पहिलाच सामना आहे असाही विचार करत नव्हतो. माझ्यासमोर एक आंतरराष्ट्रीय गोलंदाज होता आणि मंच मोठा होता. पण मी फक्त माझ्या नेहमीच्या पद्धतीनं खेळलो’, सूर्यवंशी पुढं म्हणतो...

सोमवार 28 एप्रिल...सकाळी 10 वा. वैभव सूर्यवंशीनं पहिला फोन केला तो  आपले बालपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांना. पायांच्या हालचाली आणि तंत्राबद्दल थोडीशी चर्चा झाल्यानंतर वैभव त्यांना आत्मविश्वासानं म्हणाला, ‘सर, आज मै माऊंगा’...ओझा यांनी त्याला सांगितलं, ‘तू फटकेबाजी निश्चतच कर, मात्र त्या भरात विकेट गमावू नकोस. शांतपणे खेळ, यशस्वीशी बोलत राह़ा’...संध्याकाळी तो पॅव्हिलियनमधून मैदानात दाखल झाला अन् त्यानं बॅट तलवारीसारखी पारजली. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्सविऊद्ध वैभवनं फक्त 38 चेंडूंत सात चौकार आणि 11 षटकारांची बरसात करत 101 धावा फटकावल्या त्या चक्क 265.79 च्या स्ट्राईक रेटनं...

बिहारातून आणि विविध वयोगटांतील क्रिकेटमधून उदयास आलेला वैभव सूर्यवंशी पहिल्यांदा नजरेत भरला तो ऑक्टोबर, 2023 मध्ये झालेल्या विनू मंकड चषक स्पर्धेत. तिथ त्यानं बिहारतर्फे सर्वाधिक म्हणजे पाच सामन्यांतून 393 धावा जमविल्या त्या एक शतक व तीन अर्धशतकांसह...त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये आंध्र प्रदेशात झालेल्या चौरंगी मालिकेत तो भारत ‘ब’तर्फे झळकला. या मालिकेत बांगलादेश व इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघांसह भारत ‘अ’चाही समावेश होता. 2024 मधील आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारताचा अंतिम संघ निवडणं हे त्या सामन्यांच्या आयोजनामागचं उद्दिष्ट होतं. मात्र 41, 0 अन् 8 धावा ही कामगिरी त्याला संघात स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीनं पुरेशी नव्हती...

परंतु त्यानंतर बिहारच्या 23 वर्षांखालील शिबिरात वैभव सूर्यवंशीनं सगळ्यांना असं प्रभावित केलं की, गेल्या वर्षी जानेवारीत मुंबईविऊद्धच्या रणजी चषक सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्याची संधी त्याला मिळाली. त्यावेळी त्याचं वय 12 वर्षे आणि 284 दिवस...तो 1986 नंतरचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वांत तऊण भारतीय आणि बिहारतर्फे रणजी खेळलेला दुसरा सर्वांत लहान खेळाडू...वैभवपेक्षा कमी वयात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेत ते फक्त तीनच भारतीय...अलिमुद्दीन (12 वर्षं 73 दिवस), एस. के. बोस (12 वर्षं 76 दिवस) अन् मोहम्मद रमजान (12 वर्षं 247 दिवस)...

गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चेन्नई येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्धच्या सामन्यात 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं 58 चेंडूत शतक ठोकलं आणि 19 वर्षांखालील कसोटीत सर्वांत जलद शतकाची नोंद करणारा भारतीय फलंदाज ठरण्याचा मान त्यानं मिळविला. बिहारच्या या फलंदाजाला देशभरात प्रसिद्धी देऊन गेली ती ही खेळी...इतक्या लहान वयात गाजविलेल्या पराक्रमांमुळं ‘आयपीएल’मधील संघाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं नसतं तरच नवल. मग वैभवला खेचण्यासाठी नोव्हेंबर, 2024 मध्ये झालेल्या महालिलावात प्रचंड युद्ध झालं ते दिल्ली कॅपिटल्स नि राजस्थान रॉयल्स यांच्यात. सरतेशेवटी 1.1 कोटी ऊपयांना त्याला करारबद्ध करण्यात राजस्थान यशस्वी झालं. 13 व्या वर्षी तो बनला ‘आयपीएल’ करार मिळविणारा सर्वांत तऊण खेळाडू...

गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या ‘एसीसी’ 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत वैभव सूर्यवंशीनं पाच सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह 176 धावा केल्या. या दोन्ही अर्धशतकांची नोंद झाली ती चुरशीच्या सामन्यांमध्ये...वैभवला बिहारतर्फे पहिला टी-20 सामना खेळण्याची संधी सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत प्राप्त झाली, परंतु तिथं त्याला धक्के सहन करावे लागले...त्याच सुमारास तो 13 वर्षं नि 269 दिवस वयावर विजय हजारे चषक स्पर्धेत खेळताना ‘अ’ श्रेणी क्रिकेट खेळलेला सर्वांत कमी वयाचा भारतीय खेळाडू बनला...

वैभव सूर्यवंशी या भरारीचं श्रेय देतो तो पालकांनी त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात यावं यासाठी काढलेल्या अमाप कष्टांना, केलेल्या प्रचंड त्यागाला...‘मी आज जो काही आहे तो माझ्या पालकांमुळं. आई माझ्या सरावाच्या वेळापत्रकाचा विचार करून रात्री 11 वा. झोपायला गेल्यानंतर जेमतेम तीन तास झोपायची अन् पहाटे 2 वा. उठायची. त्यानंतर ती माझ्यासाठी जेवण बनवत असे...माझ्या वडिलांनी मला आधार देण्यासाठी त्यांचं काम सोडून दिलं आणि थोरला भाऊ ते सांभाळू लागला. घर मोठ्या कष्टानं चालत असूनही बाबा सदैव माझ्या पाठीशी उभे राहिले’, वैभवचे त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देणारे शब्द...

पटणा येथील क्रिकेट प्रशिक्षक मनीष ओझा यांचंही त्याच्या उदयात काही कमी योगदान नाही. त्यांनी त्याच्यातली विशेष प्रतिभा हेरली आणि त्या वेळी 10 वर्षांच्या असलेल्या वैभवला दिवसाकाठी किमान 600 चेंडू खेळायला लावले. संधी दार ठोठावेल तेव्हा मोठ्या आव्हानासाठी त्यानं सज्ज असावं हा त्यामागचा उद्देश...‘तो आठ वर्षांचा असताना वडील संजीव त्याला माझ्याकडे घेऊन आले. प्रत्येक मूल वेगळं असतं. पण त्याच्या वयाच्या इतर मुलांचा विचार करता त्याच्याकडे जे काही शिकवलं जाईल ते व्यवस्थित अंमलात आणण्याची जाण होती. त्याचा स्टान्स, बॅकलिफ्ट, अंमलबजावणी नि हेतू या चारही आधारस्तंभांमध्ये नेहमीच समन्वय राहिला’, ओझा सांगतात...

बिहार क्रिकेट संघटनेनं सुद्धा वैभव सूर्यवंशीला वेळीच पाठिंबा दिला, तर तिलक नायडू यांच्या अध्यक्षतेखाली 19 वर्षांखालील राष्ट्रीय निवड समितीनं त्याला युवा कसोटी क्रिकेटच्या विश्वात ढकललं...अन् ‘आयपीएल’ सुरू होण्यापूर्वी ताशी 150 किलोमीटरांपेक्षा जास्त वेगानं अंगावर येणाऱ्या ‘साइड-आर्म थ्रोडाऊन’चा मुकाबला करायला लावून राहिलेले पैलू पाडले ते राजस्थान रॉयल्समधील प्रशिक्षक राहुल द्रविड व झुबिन भऊचा जोडीनं !

विक्रमांचा सपाटा लावणारी कामगिरी...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article