तोंडात ‘पान’ गेले म्हणून दंड
या जगात कोणत्या भागात काय नियम असतील, याची कल्पना करणेही अशक्य आहे. ही घटना ब्रिटनमधील लिंकनशायर नामक भागातील आहे. या भागात वास्तव्य करणारा एक वृद्ध गृहस्थ नेहमीप्रमाणे सकाळी चालण्यासाठी घराबाहेर पडला होता. रॉय मार्श असे त्याचे नाव आहे. मार्श नेहमीप्रमाणे फिरत असताना अचानक त्यांना जांभई आली आणि त्याचवेळी वाऱ्यासमवेत एका झाडाचे पान त्यांच्या तोंडात गेले. आता ही घटना आपल्याला अत्यंत किरकोळ वाटणे स्वाभाविक आहे. कारण आपणही अनेकदा असा अनुभव घेतलेला असतो. आपण चालत असताना वाऱ्यामुळे धूळ किंवा पाने तोंडात जाऊ शकतात. काहीवेळा डास किंवा काही कीटकही आपल्या तोंडात जातात. आपण ते बाहेर थुंकून टाकतो.
पण मार्श यांना मात्र, तोंडात चुकून गेलेले हे पान चांगलेच महागात पडले. मार्श यांचे वय खूपच अधिक आहे. त्यांना अस्थम्याचा त्रासही आहे. हे पान त्यांच्या तोंडात आतपर्यंत गेले होते. आपल्याला त्याचा त्रास होऊ नये, म्हणून त्यांनी ते त्वरित थुंकून टाकले. वास्तविक ही त्यांची कृती अत्यंत नैसर्गिक होती. कारण, कोणीही असेच केले असते. तथापि, ब्रिटन आणि प्रत्येक पाश्चात्य देशात सार्वजनिक स्थानी, पार्कांमध्ये किंवा मार्गांवर थुंकणे हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली. अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या या ‘अपराधा’साठी 250 पौंडाचा दंड ठोठावला. आपण हेतुपुरस्सर ही थुंकण्याची कृती केली नव्हती. तो चुकुन आणि नैसर्गिकपणे घडलेली बाब होती. त्यामुळे दंड क्षमापित केला जावा, असा युक्तीवाद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तथापि, अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवून त्यांना दंड भरण्याचा आदेश दिला.
नंतर, त्यांचे वय आणि त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांचा दंड 250 पौंडावरुन 150 पौंडांवर आणण्यात आला. त्यांना तो भरावाच लागला. अधिकाऱ्यांनी मानवतेच्या भूमिकेतून थोडा विचार केला असता, किंवा ‘कॉमनसेन्स’ दाखविला असता, तर माझी बाजू त्यांच्या लक्षात आली असती, असे मार्श यांचे म्हणणे आहे. थुंकण्याची कृती हेतुपुरस्सर केली असती, तर ते प्रकरण वेगळे झाले असते. पण एवढा विचार अधिकाऱ्यांनी केला नाही, असा त्यांचा आक्षेप आहे. भारतासारख्या स्थानी आपल्याला असे प्रसंग खूपच आश्चर्यकारक वाटतात.