55 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा आता घेणार शोध
ब्रिटिश वंशाची एक मुलगी ऑस्ट्रेलियात 55 वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत अनेकदा पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात आला, परंतु काहीच हाती लागले नाही. आता तिचा ठावठिकाणा सांगणाऱ्या इसमाला 10 लाख डॉलर्स म्हणजेच 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक इनाम देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शेरिल ग्रिमर ही 55 वर्षांपूर्वी न्यू साउथ वेल्सच्या एका समुद्र किनाऱ्यावरून गायब झाली होती. तिचा अनेकदा शोध घेण्यात आला, परंतु कुठलाच सुगावा लागू शकला नाही. अलिकडेच पुन्हा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
शेरिलच्या दशकांपेक्षा जुन्या शोधात यश मिळाले असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मुलीच्या अवशेषांच्या शोधासाठी श्वानांची मदत घेणाऱ्या एका स्वयंसेवी समुहाने एक ‘महत्त्वपूर्ण क्षेत्रा’ची ओळख पटविली असल्याचे सांगितले आहे. नवी माहिती समोर आल्याची पुष्टी पोलिसांनी दिली, परंतु अधिक तपशील देणे टाळले आहे. या घडामोडींमुळे ग्रिमर परिवाराला दीर्घकाळापासून कायम असलेल्या रहस्याचे उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे.
पोलिसांनी वॉलोन्गॉन्गच्या एका क्षेत्रात सखोल शोध घेतला, याच भागाचे नाव 50 वर्षांपूर्वी एका आरोपीने कबुलीत घेतले होते, परंतु या प्रयत्नाचे कुठलेच परिणाम समोर आलेले नाहीत. शेरिलच्या अवशेषांचा शोध कुठल्याही महत्त्वपूर्ण निष्कर्षाशिवाय समाप्त झाल्याचे ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिक कॉर्पोरेशनने सांगितले आहे. मुलीच्या अवशेषाचा शोध ज्या ठिकाणी घेण्यात आला, त्या ठिकाणाचा उल्लेख सर्वप्रथम 1971 मध्ये एका इसमाने स्वत:च्या कबुलीत केला होत. याला पोलिसांनी ‘मर्करी’ नाव दिले होते. त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले, कारण कथित गुन्ह्यावेळी तो केवळ 17 वर्षांचा होता.
संबंधित ठिकाणी शोध
आरोपीच्या कबुलीत गुरांसाठी जाळे आणि संबंधित वृक्षाच्या प्रकारासह विशिष्ट तपशील सामील होता, जेथे त्याने शेरिलचा मृतदेह सोडल्याचा दावा केला होता, त्या काळात अधिकाऱ्यांनी त्याच्या कबुलीला अविश्वसनीय मानले आणि त्या क्षेत्राची कधीच तपासणी झाली नव्हती.
1970 मध्ये झाली होती गायब
जानेवारी 1970 मध्ये तीन वर्षीय शेरिल ही वॉलोन्गॉन्गच्या नजीक फेयरी मीडो समुद्र किनाऱ्यावरून गायब झाली होती. यानंतर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक काळापर्यंत चालणाऱ्या बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू झाला. या प्रकरणाची वारंवार समीक्षा करूनही 55 वर्षांपासून हा शोध एक रहस्य ठरला आहे.
शोधात मिळालेली हाडं प्राण्याची
शोधक्षेत्रात मिळालेली हाडं ही प्राण्याची होती. तेथील शोध पूर्ण झाला असल्याचे न्यू साउथ वेल्स पोलिसांकडून सांगण्यात आले. शेरिल ग्रिमरचे अपहरण आणि संशयास्पद हत्येचा तपास न्यू साउथ वेल्स पोलीस होमिसाइड स्क्वॉडकडून सक्रीय स्वरुपात केला जात आहे. शेरिलविषयी माहिती देणाऱ्यास 10 लाख डॉलर्सचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. शेरिलचा परिवार ती बेपत्ता होण्याच्या काही काळापूर्वी इंग्लंडमधून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला होता. शेरिलच्या बेपत्ता होण्याच्या तपासात अनेक वळणं आली, 2017 मध्ये एका इसमावर तिच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु पुरेसे पुरावे नसल्याने तो सिद्ध होऊ शकला नाही.