विहिरी-कूपनलिकांवरील पंपसेट चोरणाऱ्या त्रिकुटाला घटप्रभा पोलिसांकडून अटक
3 लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : गोकाक तालुक्यातील वेगवेगळ्या गावात शेतकऱ्यांनी विहिरी व कूपनलिकांना लावलेले पंपसेट व केबल वायर चोरणाऱ्या त्रिकुटाला घटप्रभा पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून पंपसेट, केबल व एक मोटारसायकल असा 3 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. कल्लोळ्ळी, राजापूर व बिरनगड्डी परिसरात या त्रिकुटाने हैदोस घातला होता. शेतातील पंपसेट व केबल वायर सांभाळणे शेतकऱ्यांसाठी मुश्कील झाले होते. तीन गावातील अनेक शेतकऱ्यांचे पंपसेट व केबल त्यांनी पळविले आहे.
गोकाकचे पोलीस उपअधीक्षक डी. एच. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली घटप्रभाचे पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. तुकाराम डबाज, दुर्गाप्पा सवरी, रामप्पा चिप्पलकट्टी तिघेही राहणार पामलदिन्नी, ता. गोकाक अशी त्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला, उपनिरीक्षक एच. के. नरळे, एम. एस. वनहळ्ळी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. एम. पाटील, आर. के. होळकर, आर. आर. गिड्ड्याप्पगोळ, बी. एम. तळवार, आर. के. धुमाळे, बी. एस. नाई आदींचा समावेश असलेल्या पथकाने या त्रिकुटाच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्याच आठवड्यात चोरी प्रकरणातील आरोपींना अटक करून सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले होते. त्यापाठोपाठ शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरलेल्या त्रिकुटाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.