अडीच कोटी वर्षे जनुके तीच
उत्क्रांती हा प्रत्येक सजीवाचा स्थायीभाव आहे. उत्क्रांती याचा अर्थ असा की, सजीवामध्ये काळाबरोबर जनुकीय परिवर्तन घडत जाते आणि त्या सजीवाची नवी रुपे निर्माण होतात. सध्याच्या मानवाची निर्मितीही अशाच उत्क्रांतीमुळे झालेली आहे, असे विज्ञानाने स्पष्ट केले आहे. याच उत्क्रांतीमधून पृथ्वीवर ‘जैवबहुविधता’ निर्माण झाली आहे. तथापि, काही सजीव या सिद्धांताला अपवाद आहेत.
संशोधकांना निरीक्षणातून असे आढळून आले आहे, की पृथ्वीवर असे काही सजीव आहेत, की ज्यांच्या जनुकांमध्ये गेल्या अडीच कोटी वर्षांहून अधिक काळपर्यंत कोणतीही उत्क्रांती झालेली नाही. याचा अर्थ असा की हे सजीव अडीच कोटी वर्षांपूर्वी जसे होते, तसेच आजही आहेत. जणू त्यांनी त्यांच्यातील उत्क्रांनीला रोखून धरले आहे. पतंग या सजीवाच्या काही प्रजाती, फुलपाखरांच्या काही प्रजाती यांच्यात गेल्या अडीच तीन कोटी वर्षांमध्ये कोणतेही परिवर्तन झालेले नाही.
पर्यावरण, तापमान आणि अन्य नैसर्गिक बाह्या परिवर्तनामुळेही सजीवांमध्ये जनुकीय परिवर्तन घडून उत्क्रांती घडत असते. काही सजीव या प्रक्रियेत नामशेष होतात किंवा काही नवे जीव जन्माला येतात. सहा कोटी वर्षांपूर्वी डायनासोर नामक सजीव परिवर्तीत होणाऱ्या पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकले नाहीत. म्हणून त्यांचा विनाश झाला, असेही विज्ञानाचे सिद्ध केले आहे. तथापि, हे पतंग आणि फुलपाखरे या नियमलाही अपवाद ठरली आहेत. सर्व प्रकारची पर्यावरणीय परिवर्तने गेल्या अडीच कोटी वर्षांमध्ये त्यांनी यशस्वीरित्या झेलली आणि आपली जनुकीय मूलता किंवा ओरिजिनॅलिटी पूर्वीप्रमाणेच राखली. संशोधकांनाही या छोट्या सजीवांच्या या अभूतपूर्व क्षमतेच आश्चर्य वाटत आहे. आता त्यांच्यावर या दृष्टीकोनातून अधिक संशोधन केले जात असून या सजीवांमध्ये ही क्षमता का आणि कशी निर्माण झाली आहे, हे जाणण्याचा प्रयत्न केला जात आहे.