तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचे भविष्य अंधकारमय
खानापूर ग्रामीण भागातील मराठी शाळा पटसंख्याअभावी बंद पडण्याची भीती : प्राथमिक शाळांमध्ये गुणात्मक शिक्षणाचा अभाव
खानापूर : खानापूर तालुक्यातील मराठी प्राथमिक शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याचा परिणाम म्हणून तालुक्यातील अनेक मराठी शाळा बंद करण्याची नामुष्की ओढवलेली आहे. मराठी शाळांची पटसंख्या कमी होण्यामागचे नेमके कारण काय, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. शिक्षकांची कमतरता हे दृष्टीपथातील एक कारण असले तरी खरे कारण मात्र वेगळेच आहे. तालुक्यातील भ्रष्ट शिक्षण खाते आणि कामचुकार मनोवृत्तीचे बहुसंख्य शिक्षक आणि सीआरसी ते शिक्षण अधिकारी अशी साखळी बनल्याने शैक्षणिक दर्जा खालावल्याने प्राथमिक शाळेंची पटसंख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणता येईल. तालुक्यात पूर्वी अगदी शेवटच्या टोकातील खेडेगावातही प्राथमिक शिक्षणाचा एक विशेष दर्जा होता. शिक्षण हे सर्वश्रेष्ठ दान समजून त्यांनी सेवा बजावली. त्यांच्या प्रामाणिक सेवेचे फळ म्हणून अनेक विद्यार्थी नावाऊपास आले. शाळांचा दर्जाही टिकून राहिला. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा टिकून होता. तसेच अधिकाऱ्यांचा वचकही बराच होता. यामुळे सहसा शिक्षकवर्ग शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे येण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. खानापूर तालुक्यात ही परिस्थिती 1990 ते 1995 पर्यंत होती. त्या काळातील चांगल्या शिक्षणामुळे पालकवर्गही आपल्या मुलांना मातृभाषेच्या शाळेत पाठविण्यासच प्राधान्य देत असत. यामुळे प्राथमिक शाळांची पटसंख्या टिकून होती.
हल्याळ, सुपा तालुक्यातील मराठी शाळांचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात
अलीकडच्या काही वर्षात शिक्षणातील धोरणात बदल करण्यात आला. आणि संपन्मूल अधिकारी म्हणून शिक्षकांनाच शाळा तपासणी अधिकारी म्हणून सेवा बजावण्याची योजना आखण्यात आली. त्यानुसार प्राथमिक शाळेचे शिक्षकच सीआरसी म्हणून काम पाहू लागले. त्यातूनच भ्रष्टाचाऱ्याची साखळी निर्माण झाली आणि शिक्षणाचा दर्जाच कोसळला. शिक्षक आणि अधिकारी यांच्यातील अंतर कमी झाल्याने तालुका शिक्षण अधिकाऱ्यांचा वचकच नाहीसा झाला. त्यामुळे शिक्षकही कामचुकार बनले. याचा परिणाम प्राथमिक शिक्षणावर झाला. प्राथमिक मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावल्यानेच प्र्राथमिक शिक्षकांनी आपलीच मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातल्याने सामान्य पालकांचा विश्वास मराठी शाळेवरील कमी झाला. त्यामुळे पालकांनीही इंग्रजी शाळेची कास धरली. मराठीबहूल प्रदेशातील अनेक शाळा अगदी मोजक्या पटसंख्येवर चालत आहेत. या शाळेवर कर्नाटक सरकारची कुऱ्हाड केंव्हा कोसळेल हे सांगता येणार नाही. खानापूर तालुक्यात मराठी शाळांचे भविष्य अंधकारमय बनले आहे. येत्या चार-पाच वर्षात तालुक्यातील मराठी शाळांची अवस्था दयनिय होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ज्या प्रमाणे हल्याळ, सुपा तालुक्यातील मराठी शाळांचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आले. तीच अवस्था खानापूर तालुक्यातील मराठी शाळांची होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शैक्षणिक दर्जाच खालावल्याने पाल्यांचा ओढा खासगी शाळांकडे
अलीकडच्या वर्षांतील तालुक्यातील प्राथमिक तसेच माध्यमिक शैक्षणिक परिस्थिती उलटी झाली आहे. तालुक्यातील प्राथमिक शाळांचा दर्जाही बराच खालावला आहे. वास्तविक प्राथमिक शाळांना येणाऱ्या मुलांसाठी राज्य शासनाने अनेक कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. त्यामध्ये मुलांना मध्यान्ह आहार, मोफत गणवेष, मोफत पाठ्यापुस्तके, दररोज पौष्टिक दूध आणि अंडी, केळी याशिवाय बूट व सॉक्स अशा बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत. असे असतानाही केवळ तालुक्यातील प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जाच खालावल्याने भरमसाठ फी आकारणाऱ्या इंग्रजी शाळांना आपली मुले पाठविण्याकडे पालकवर्गाचा कल दिसून येत आहे.
बीईओ, बीआरसी किंवा सीआरसी यांचा शिक्षकवर्गावर मुळीच वचक नाही
विशेष म्हणजे बऱ्याच शाळांतील शिक्षकवर्ग शाळेला वेळेवर जात नाहीत, गेले तरी मुलांना योग्यप्रकारे शिकवत नाहीत. पण हल्ली खानापूरचे शिक्षण कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे. त्या ठिकाणी असलेले बीईओ, बीआरसी किंवा सीआरसी यांचा शिक्षकवर्गावर मुळीच वचक नाही. दरवर्षी होणारी शाळा तपासणी हे केवळ नाटक असते. काही शाळांतील शिक्षकवर्ग शाळेला न जाता इतर व्यवसायात मग्न असतात. त्यामुळे त्यांचे शाळेवर लक्षच नसते. या मुख्य कारणामुळेच प्राथमिक शाळांमध्ये गुणात्मक शिक्षणाचा अभाव आहे. तालुक्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शिक्षक आपली प्रामाणिक सेवा बजावत असल्याने काही शाळांचा शैक्षणिक दर्जा एकदम गुणात्मक आहे. अशा शाळा अगदी मोजक्याच आहेत. यापूर्वी काही शिक्षकांनी तालुक्यातील मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र सीआरसीच्या नियुक्तीमुळे तेही या शासकीय यंत्रणेचे भागीदार बनले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. पण आजच्या परिस्थितीतही तालुक्यातील प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी तालुक्यात निर्माण झालेल्या काही संस्थांनी खासगीरित्या प्रयत्न चालविले आहेत.