‘भविष्य युद्धात नाही तर बुद्धात आहे’
प्रवासी भारतीय संमेलनात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : 70 देशांमधील प्रतिनिधींची उपस्थिती
वृत्तसंस्था/भुवनेश्वर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ओडिशाच्या राजधानीमध्ये प्रवासी भारतीय संमेलनाला उपस्थिती लावत उपस्थितांना संबोधित केले. एक काळ असा होता जेव्हा जग तलवारीच्या बळावर साम्राज्यांचा विस्तार करत होते. तेव्हा आपल्या सम्राट अशोकाने येथे शांतीचा मार्ग निवडला होता. आपल्या वारशाची हीच ताकद असल्यामुळे भारत आज जगाला हे सांगू शकतो की भविष्य युद्धात नाही तर बुद्धात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. भुवनेश्वर येथे 18 व्या प्रवासी भारतीय दिवस व संमेलनाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्षा क्रिस्टीन कार्ला कांगालू यांनी परिषदेला व्हर्च्युअल प्रणालीद्वारे संबोधित केले. या कार्यक्रमात 70 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. हे संमेलन दोन दिवस चालणार असून त्याचा समारोप राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होईल. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी भारतीय प्रवासींसाठी एका विशेष पर्यटन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून सुटणारी ही रेल्वे तीन आठवड्यांसाठी अनेक पर्यटनस्थळांना भेट देईल.
संपूर्ण जग भारताच्या यशाकडे पाहतेय : पंतप्रधान
पंतप्रधान मोदी यांनी संबोधित करताना सांगितले की, आज संपूर्ण जग भारताचे यश पाहत आहे. आज जेव्हा भारताचे चांद्रयान शिवशक्ती बिंदूवर पोहोचते तेव्हा आपल्या सर्वांना अभिमान वाटतो. संपूर्ण जग डिजिटल इंडियाची शक्ती पाहून आश्चर्यचकित होत असताना आपणा सर्वांचा उर भरून येतो. आज भारतातील प्रत्येक क्षेत्र नवी उंची गाठण्यासाठी पुढे जात असल्यामुळे जगातील सर्व देश भारताकडे आकर्षित होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण येथे भारत, भारतीयत्व, संस्कृती आणि विकास साजरा करत आहोत. तुम्ही ज्या भूमीवर आहात ती भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतिबिंब आहे. गेल्या 10 वर्षांत मी अनेक जागतिक नेत्यांना भेटलो. जगातील प्रत्येक नेता त्यांच्या देशातील भारतीय डायस्पोराचे निश्चितच कौतुक करतो. भारताने सामाजिक मूल्यांची जपणूक केलेली आहे. त्यामुळेच भारतीय जिथे जातात तिथे ते तिथल्या समाजाशी जोडले जातात, असे गौरवोद्गारही पंतप्रधानांनी काढले. भारत मेड इन इंडिया लढाऊ विमाने बनवत आहे. हा दिवस दूर नसून लवकरच तुम्ही (एनआरआय) मेड इन इंडिया विमानातून प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यासाठी याल, असा आशावादही पंतप्रधानांनी व्यक्त केला.