हरियाणात आंदोलनस्थळी शेतकऱ्याची आत्महत्या
वृत्तसंस्था/चंदीगड
हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान गुरुवारी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. तरनतारन जिह्यातील पाहुविंड गावातील रहिवासी रेशम सिंग (55) यांनी लंगर स्थळाजवळ सल्फा प्राशन करत जीवनयात्रा संपवली. खानौरी आणि शंभू सीमेवर धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम सुटू लागला आहे. गुरुवारी शंभू सीमेवरील मोर्चात किसान मजदूर संघर्ष समितीच्या एका शेतकऱ्याने सल्फा (विष) सेवन केले. सल्फा गिळल्यानंतर लगेचच शेतकऱ्याची प्रकृती बिघडली. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पंजाबमधील तरनतारन येथील शेतकरी रेशम सिंग हे तीन दिवसांपूर्वीच शंभू सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सामील झाले होते. किसान मजदूर संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष सुखविंदर सिंग सभारन यांनी मृत शेतकऱ्याच्या वारसांना सरकारतर्फे 25 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे.