कॉफीच्या कपात दिसते भविष्य
आपले भविष्य आधी जाणून घेण्याची उत्सुकता जगात जवळपास प्रत्येक माणसाला आहे. देश वैज्ञानिकदृष्ट्या कितीही प्रगत असो, भविष्याविषयीही आस्था ही सामायिक भावना असते. त्यामुळे भविष्य पाहणे किंवा विचारणे ही अंधश्रद्धा आहे, असा कितीही प्रचार झाला, तरी भविष्य विचारणे लोक सोडत नाहीत आणि त्यामुळे भविष्य सांगणाऱ्यांची संख्याही मोठी असते. सध्या ब्रिटनमधील हर्टफोर्डशायर वास्तव्य करणाऱ्या एका महिलेची या संदर्भात बरीच चर्चा होत आहे.
या महिलेचे नाव मारिया इओनू असे आहे. ही महिला दुसऱ्यांचे भविष्य सांगत नाही. तर स्वत:चे आणि इतरांचेही प्रत्येक दिवशीचे भविष्य ओळखते. हे भविष्य, प्रतिदिन ती सकाळी जी कॉफी पिते, त्या कॉफीच्या कपात दिसते, असे तिचे प्रतिपादन आहे. अगदी बालपणापासूच आपल्याला आपले भविष्य सकाळच्या कॅफीच्या कपात पाहण्याची सवय लागली आहे, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे तिची ख्याती आसपासच्या भागांमध्ये जादूगारीण किंवा चेटकीण अशी झालेली आहे. कॉफीच्या कपात तिला जी दृष्ये दिसतात, ती नंतर जशीच्या तशी खरी होतात, असा तिचा अनुभव आहे. बालपणापासून आपल्यामध्ये एक विशेष शक्ती आहे, याची जाणीव तिला झालेली होती. घरात अचानक अतिथी येणार असेल, तर तिला आधी संकेत मिळतो. तसेच घरातील दूरध्वनीची घंटा केव्हा वाजणार हे ती अचूक सांगू शकते, असे तिचे प्रतिपादन आहे. तिच्या घरातील लोकांना याचा अनुभवही आहे. तथापि, अनेकांचा यावर विश्वास बसत नाही. ही महिला प्रथम नर्स म्हणून काम करीत होती. तथापि, आता तिने आपली नोकरी सोडून भविष्यवेत्ती म्हणूनच आपले करिअर चालविले आहे. तिच्याकडे अनेक लोक भविष्य समजून घेण्यासाठी येतात. मी लोकांना त्यांना होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून सावध करते. अनेकांचे धोके मी दूर केले आहेत, असे या महिलेचे म्हणणे आहे.