फलपुष्प प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव :
जिल्हा प्रशासन, जि. पं. व फलोत्पादन विभाग, जिल्हा फलोत्पादन संघ व जिल्हा कृषक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने 66 व्या फलपुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन क्लब रोडवरील ह्युमपार्कवर आयोजित करण्यात आले आहे. ते तीन दिवस चालणार असून शनिवारी नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रदर्शनात विविध प्रकारची फुलांची रोपटी, फळांची रोपटी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. विविध पालेभाज्या, फळांची बियाणे, कृषी यंत्रोपकरणे, घरातील टेरेसवर पालेभाज्या घेण्यासाठीचे साहित्य, विविध प्रकारची सेंद्रिय खते, औषधांचे स्टॉल्स थाटण्यात आले आहेत. त्याचबरोबर कित्तूर राणी चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्यासह विविध थोर मान्यवरांच्या प्रतिकृती नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शन आवारात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. नागरिक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.