Kolhapur : कळंबा शेती गटांतर्गत 40 गावातून फुलशेतीचा सुगंध
कळंबामध्ये फुलशेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी
by सागर पाटील
कळंबा : कळंबा शेती गटांतर्गत 40 गावामध्ये दहा हेक्टर हुन अधिक क्षेत्रामध्ये फुल शेती ची लागवड करण्यात आली आहे शासनाकडून या फुलशेती साठी तीस टक्क्यांनहून अधिक अनुदान मिळत आहे त्यामुळे पारंपरिक शेती बरोबर येथील शेतकऱ्यांनी फुल शेतीची लागवड केली आहे
त्यामुळे चाळीस गावातील शेत शिवारात अनके फुलांचा सुगंध दरवळू लागला आहे. दरम्यान या मध्ये गुलाब जरबेरा झेंडू निशिगंध गलांडा यांसह अनेक फुलांना बाजार पेठेमध्ये चांगली मागणी असून शेतकऱ्यांनी या फुलांच्या लागवडीला प्राधान्याने दिल्याचे चित्र आहे. तेसच पारंपरिक शेतीतील वाढता खर्च, नैसर्गिक आपत्तींचे संकट आणि बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे शेतकरी हताश होत होते. मात्र शासनाच्या योजनांचा योग्य उपयोग करून आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा आधार घेत शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे वळत नव्या युगाची सुरुवात केली आहे.
पारंपरिक शेतीला मर्यादा
ऊस, भात, ज्वारी, भाजीपाला अशा पारंपरिक पिकांत खर्च मोठा आणि नफा तुलनेने कमी होत होता. बियाणे, खते, कीडनाशके आणि मजुरीचा वाढलेला खर्च शेतकऱ्यांच्या परवडत नाही. यामुळे शेतीकडे तरुणांचा ओढा कमी होऊ लागला होता. मात्र गेल्या काही वर्षांत फुलशेतीचा पर्याय शेतकऱ्यांसमोर आला. या शेतीत कमी क्षेत्रावर जास्त नफा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी त्याकडे आकर्षित होऊन होत आहे.
फुलशेतीचा विस्तार
कळंबा, कात्यायनी, हंणबरवाडी, पचगाव, कंदलागव, गिरगाव, म्हाळुंगे, निगवे खालसा, दिंडनेरली, जैताळ, येवती, बाचणी या गावांसह तब्बल ४० गावांमध्ये फुलशेती फुलली आहे. गुलाब, जरबेरा, झेंडू, निशिगंध, गलांडा यांसह अनेक फुलांचे उत्पादन घेतले जात आहे. तरुण शेतकरी ग्रीन शेड हाऊस उभारून आधुनिक पद्धतीने फुलशेती करत आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतले जात असून कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले आहे.
शासनाचे सहाय्य महत्त्वाचे
सध्या शासनाकडून ३० टक्क्यांहून अधिक अनुदान मिळत आहे. हे अनुदान शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. परंतु शेतकऱ्यांचा आग्रह आहे की हे अनुदान आणखी वाढवावे. विशेषतः शेड नेट हाऊस व ग्रीन हाऊस उभारणीसाठी विशेष योजना राबवून अधिक अनुदान दिले जावे. तसेच बँकांकडून कर्जप्रक्रिया सोपी व सुलभ केली गेल्यास अधिकाधिक शेतकरी फुलशेतीकडे वळतील.
उत्पन्नात मोठी वाढ
फुलशेतीमुळे शेतकऱ्यांना वार्षिक पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असून त्यातून दीड ते दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा होत आहे. हे पारंपरिक शेतीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना फुलशेतीमुळे रोजगार मिळत आहे. महिलांनाही मजुरीचे काम मिळत असल्याने घरखर्चाला हातभार लागत आहे.
बाजारपेठेत वाढती मागणी
फुलांना धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात कायमच मागणी असते. नित्यपूजेसाठी मंदिरात झेंडू व गुलाब, तर लग्न, वाढदिवस, बारसेसारख्या कार्यक्रमांसाठी गुलाब व जरबेरा मोठ्या प्रमाणावर लागतात. समारंभात हार-तुर्यांसाठी झेंडू व गलांड्याला तर प्रचंड मागणी आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात आणि सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात कळंबा परिसरातून फुलांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा झाला. शासनाने कृत्रिम फुलांवर बंदी घातल्याने नैसर्गिक फुलांची मागणी दुप्पट झाली आहे.
तरुण शेतकऱ्यांचा कल
फुलशेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने तरुण शेतकऱ्यांचा कल या शेतीकडे अधिक आहे. ऐ- आय इंटरनेट, यूट्यूब आणि कृषी विभागाच्या कार्यशाळांमधून त्यांनी नवनवीन माहिती आत्मसात केली आहे. ड्रिप सिस्टीम, प्लास्टिक मल्चिंग, तापमान नियंत्रण या आधुनिक पद्धतींचा वापर करून उत्पादनात गुणवत्ता टिकवली जात आहे.
ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती
फुलशेतीमुळे फक्त शेतकऱ्यांचे उत्पन्नच वाढले नाही तर ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीही झाली आहे. महिलांना फुले तोडणे, माळा-गुच्छ बनवणे, हार-तुरे तयार करणे अशी कामे मिळत आहेत. यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा
फुलशेतीत अजूनही अनेक अडचणी आहेत. कीड व रोगांचा प्रादुर्भाव, अचानक बदलणारे हवामान, बाजारातील चढउतार ही आव्हाने शेतकऱ्यांसमोर कायम आहेत. तसेच उत्पादन मोठे असूनही कधी कधी बाजारभाव घसरल्याने तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा शासनाने या शेतीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. फुल निर्यातीतही शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.
कळंबा शेती गटातील तब्बल 40 गावांत फुलशेती फुलली आहे. या शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून महिलांनाही रोजगार मिळत आहे. शासनाने यासाठी अधिक अनुदान देणे गरजेचे आहे.
नामदेव गिरीगोसावी, कृषी सहाय्यक कळंबा