अस्वल हल्ल्यातील जखमीवर वनखात्याने खर्च करावा
जोयडा तालुक्यातील कुणबी समाजातर्फे मागणी
कारवार : अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लांटे ता. जोयडा येथील शेतकऱ्यावरील उपचाराचा संपूर्ण खर्च वनखात्याने करावा. अडचणीत आलेल्या त्या कुटुंबाला वनखात्याने आर्थिक मदत करावी. शिवाय त्या कुटुंबातील एकाला वनखात्याने रोजगार मिळवून द्यावा, अशी मागणी कुणबी समाजातर्फे आणशी एसीएफ यांच्याद्वारे शिरसीतील अरण्य संरक्षण अधिकारी कॅनरा सर्कलकडे केली. अर्जुन पुनो वेलीप (वय 65,) असे जखमीचे नाव आहे. सदर घटना शुक्रवारी लांटे येथे घडली आहे. वेलीप शुक्रवारी सकाळी शेताकडे जाताना त्यांच्यावर अस्वलाने जोरदार हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या गुप्तांगालाही जखम झाली आहे.
मदतीसाठी कुणबी समाज धावला
वेलीप यांच्या मदतीला जोयडा तालुक्यातील कुणबी समाज धावून आला आहे. कुणबी समाजाचे कारवार जिल्हा अध्यक्ष सुमास गावडा, जोयडा ता. अध्यक्ष प्रेमानंद वेलीप,संस्थापक अध्यक्ष साबळ कुंडीलकरसह इतरांनी आदींनी विविध मागण्यांचे निवेदन शिरसी येथील नवसंरक्षक अधिकारी कॅनरा सर्कल यांना सादर केले.
मागण्यां पूर्ण न केल्यास आंदोलन
मागण्यांची पूर्तता केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कुणबी समाज बांधवांनी दिला आहे.