Sangli : वनविभागाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ; शेतकऱ्यांची मागणी
शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कैफियत मांडली
शिराळा : शिराळा तालुक्यात बिबट्याचे पशुधनावर हल्ले वाढले आहेत. वनविभागाने प्रत्यक्ष घटनास्थळी येवून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश आमदार सत्यजित देशमुख यांनी दिले. पाचुंत्री (ता. शिराळा) येथील शेतकरी प्रकाश पाटील व विकास पाटील यांच्या वस्तीवर गोठ्यात बांधलेल्या गाईवर मंगळवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन गायी मृत्युमुखी पडल्या. आमदार सत्यजित देशमुख यांनी या घटनेची पाहणी केली.
आमदार देशमुख म्हणाले, बळीराजाचे सर्वस्व हे त्याचे पशुधन असते. जीवापाड त्यांना जपले जाते. बिबट्याच्या सततच्या हल्ल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतात जाणे मुश्किल झाले आहे.
त्यामुळे शेकडो एकरवरील शेती नुकसानीत आली आहे. यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष सत्यजित पाटील प्रकाश पाटील, विलास पाटील, संभाजी माने, प्रमोद पाटील, सुरेश झेंडे, सचिन पाटील, मनोहर पाटील आणि शेतकरी उपस्थित होते.