या दोघी आणि जंगल...!
सुधाकर काशीद / तरुण भारत
या दोघी...एकीच वय ६० दुसरीचं ८०....दाजिपूरच्या जंगलाला लागून ठकूचा धनगरवाडा आहे. तेथे फक्त त्यांचे पिढ्यान पिढ्याचे एकच घर आहे. तिन्ही बाजुला दाट जंगल. यांच्या घरात आजही लाईट नाही. रस्ता नाही....!
ठकूचा धनगरवाडा म्हणजे कै. ठकू धनगराचे घर. त्याची चौथी पाचवी पिढी आजही तेथे रहाते या पिढीतील ठकू धनगराची नातसुन लक्ष्मी वय ६०. व ठकुची मुलगी सोना वय ८0 व एक खापर पणतू याक्षणी येथे रहातो. आजुबाजुला वस्ती नाही. गवे बिबट्या अस्वलाचा यांच्या घराजवळ सतत वावर. त्यामुळे दिवस मावळला की घराचे दरवाजे बंद . सोबतीला फक्त दोन गावठी कुत्री. घरात रॉकेल किंवा डिझेलची चिमणी . ती विझवली की रात्रभर सभोवती फक्त काळोख आणि जंगलातून वाट काढत घुसणाऱ्या वाऱ्याचा घुमणारा आवाज. रात्री कुत्री भेदरून, आकसून कुई कुई करू लागली की या दोघींनी ओळखायच . बाहेर काय तरी आलय. आणि उठायच्या भानगडीत न पडता पुन्हा मुरगटुन झोपायच. पावसाळ्यात तर तीन महिने घराबाहेर पडायच नाही. लाकुड पेटवुन धुनी करायची आणि त्याच्या उबीला बसायच. लक्ष्मी व सोना साठ व ऐंशी वयाच्या. एक नातू कामानिमित बाहेर. दोन खापर पणतू मुंबईला. त्यामुळे तशी दोघींचीच एकमेकीला साथ. लाईट नाही रेडिओ नाही टीव्ही नाही. बोलुन बोलुन दोघीच एकमेकीशी काय बोलत बसणार? मग अंगणातल्या कोंबड्या, दोन कुत्री, तीन म्हशी , दोन मांजरं यांच्याशीच त्या काही ना काही बोलत असतात. आणि तीही समजत असल्या सारख या दोघीचं ऐकतात.
यांना जगात नव्हे कोल्हापुरात काय चाललय माहित नाही. सोनाबाईला तर कोल्हापूर बघितलेल आठवत नाही. या दोघींना या जंगलातुन बाहेर पडणे शक्य नाही . पण आपल्याला दाजिपुरात या ठकूच्या धनगरवाड्यात जायला नककीच अडचण नाही. आणि एखादा महिला दिन या दोघीच्या सोबत त्यांच्या स्वच्छ सारवलेल्या अंगणात केवळ त्यांच्याशी बोलत बसुन साजरा करायलाही हरकत नाही..