परतीच्या पावसाचा जोर कायम
सर्वत्र पाणीच पाणी : शेतीपिकांना फटका : शेतकरी हवालदिल
बेळगाव : मागील चार दिवसांपासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊ लागले आहे. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत होत आहे. दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याने बाजारपेठेवरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे पाऊस कधी जातो, याचीच चिंता साऱ्यांना लागली आहे. विशेषत: हातातोंडाशी आलेल्या शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. ऑक्टोबर महिन्यात अतिरिक्त होत असलेल्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पाऊस कधी कमी होतो याकडेच लक्ष लागले आहे. ऑक्टोबर महिन्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यंदाच्या वर्षात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंदही झाली आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे.
मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ
परतीच्या पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने मार्कंडेय दुथडी भरून वाहू लागली आहे. ऑक्टोबरमध्ये दोनवेळा मार्कंडेय नदी पात्र भरून वाहत आहे. यंदा जूनपासून समाधानकारक पाऊस होऊ लागला आहे. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. जुलै-ऑगस्ट दरम्यान नदीला पूर आला होता. दरम्यान नदीकाठावरील भातशेतीला फटका बसला होता. त्यानंतर नदीचे पाणी कमी झाले होते. मात्र परतीचा पाऊस अपेक्षापेक्षा अधिक झाल्याने ऑक्टोबर महिन्यातही मार्कंडेय दुथडी भरून वाहताना दिसत आहे.
शेतीपिकांना फटका
परतीचा पाऊस अधिक प्रमाणात होत असल्याने भातपिकाला मोठा फटका बसला आहे. पावसाने भातपीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. हातातोंडाला आलेले पीक आडवे झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वर्षभर काबाडकष्ट करून मिळविलेले पीक हातातून जाणार का? अशी चिंताही सतावू लागली आहे.