For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घराबाहेर पडणारे पाऊल...धोक्याची देतेय चाहूल!

12:44 PM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
घराबाहेर पडणारे पाऊल   धोक्याची देतेय चाहूल
Advertisement

वाढत्या बालगुन्हेगारीने समाजमन अस्वस्थ, आपल्या पाल्यांच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्याची गरज, अमलीपदार्थांमुळे युवापिढी होतेय बरबाद

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात सुरू असलेल्या अप्रिय घटनांच्या मालिका अस्वस्थ करणाऱ्या आहेत. अशा घटना कधी थांबणार? त्या थांबवण्याची जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी केवळ पोलीस दलावरच आहे की बेळगावकरांवरही आहे? प्रत्येक घराघरातील पालक आपल्या मुलांची अधोगतीकडे सुरू असलेली वाटचाल रोखण्यासाठी, आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी अपयशी ठरत आहेत का? आदी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बेळगावातील संघटित गुन्हेगारी मोडून काढल्यानंतर टोळीयुद्धासारखे प्रकार पूर्णपणे थांबले आहेत. आता चोऱ्या, घरफोड्या, चेनस्नॅचिंग, वाहने चोरीचे प्रकार वाढले आहेत. याबरोबरच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी उचल खाल्ली आहे. गेल्या महिन्याभरात उघडकीस आलेल्या दोन घटना समाजमन अस्वस्थ करणाऱ्या आहेत. गांजा, पन्नीच्या नशेत तरुणाई खासकरून अल्पवयीन मुलांची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे? याचा विचार जरी केला तरी भीतीदायक चित्र डोळ्यासमोर येत आहे. 10 मे रोजी सावगाव रोडवरील एका फार्महाऊसवर एका अल्पवयीन मुलीवर तिघा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सुरुवातीला टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली. पांगुळ गल्लीतून त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण पुढील तपासासाठी मार्केट पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

Advertisement

फार्महाऊसच्या चालकांनाही पोलिसांनी अटक केली. ही घटना ताजी असतानाच 31 मे रोजी एपीएमसी पोलीस स्थानकात आणखी एका पोक्सो प्रकरणाची नोंद झाली. एका अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी अत्याचार केल्याची ती घटना आहे. डिसेंबर 2024 मध्ये ही घटना घडली आहे. काकतीजवळील डोंगरावर त्या अल्पवयीन मुलीला नेऊन तिच्यावर अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून तो व्हिडिओ दाखवत सतत चार ते पाच महिने तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

एपीएमसी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांना एफआयआर दाखल होऊन 24 तासात अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एकजण फरारी आहे. सावगाव रोड व काकती येथे घडलेल्या दोन्ही घटना लक्षात घेता परिचितांकडूनच हे प्रकार घडले आहेत. अल्पवयीन मुलींना विश्वासात घेऊन त्यांना निर्जन ठिकाणी घेऊन जायचे. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे फोटो, व्हिडिओ काढायचे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सतत ब्लॅकमेल करायचे, असा तो प्रकार आहे.

संशयितांमध्येही अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या दोन्ही प्रकरणांच्या तपासादरम्यान उघडकीस आलेली धक्कादायक गोष्ट म्हणजे अशा प्रकारांना मोबाईलचा अतिवापरही कारणीभूत ठरत आहे. पोक्सो प्रकरणाचे गांभीर्य किती आहे, या प्रकरणात किती वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे? याच्या जाणीवेचा अभाव, अमलीपदार्थांचे व्यसन, मोबाईलचा अतिवापर व नग्नतेकडचे आकर्षण आदींमुळे अशा घटना वाढल्या आहेत.

परराज्यातील अनेक विद्यार्थी बेळगावात

केजीपासून पीजीपर्यंत शिक्षणाची सोय असल्यामुळे शिक्षणानिमित्त परराज्यातील व परदेशातील अनेक विद्यार्थी बेळगावला आले आहेत. स्थानिक असो किंवा परराज्यातील विद्यार्थी असो, एकांतासाठी अधूनमधून बेळगावजवळच्या वेगवेगळ्या गावातील डोंगर शोधत असतात. सामूहिक बलात्काराची घटना ज्या काकतीजवळील डोंगरावर घडली. त्याच परिसरात आपल्या नियोजित पतीसमवेत फिरायला गेलेल्या एका वैद्यकीय विद्यार्थिनीवरही सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. एकांत शोधण्यासाठी गेलेल्या युगुलांना मारहाण करून त्यांच्याजवळील किमती वस्तू काढून घेतल्याच्याही घटना घडल्या आहेत. या घटना रोखण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे का? प्रत्येकाने आपली मुले घराबाहेर पडल्यानंतर कोठे जातात? त्यांना अमलीपदार्थांचे व्यसन जडले आहे का? हे तपासण्याची तसदी घेतली तर बऱ्याच प्रमाणात अशा घटनांवर आळा घालणे शक्य आहे.

पालकांनी दक्ष रहावे

बेळगाव परिसरात अलीकडच्या काही महिन्यात घडलेल्या घटना लक्षात घेता लहान वयातच जडलेल्या अमलीपदार्थांच्या व्यसनामुळे शिक्षण घेण्याच्या वयात मुले वाहात जात आहेत, हे लक्षात येते. नव्याने दाखल झालेले पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनीही या दोन्ही घटनांचे गांभीर्य ओळखून अशा घटना टाळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. खरेतर ही एक सामाजिक समस्या आहे. व्यसनाधीनता, मोबाईलचा अतिवापर, संगतीचे परिणाम आदींवर पालकांनाच लक्ष ठेवावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.