द. आफ्रिकेकडून पाकला फॉलोऑन
पाकचा पहिला डाव 194 धावात समाप्त, दु. डाव बिनबाद 80
वृत्तसंस्था/ केपटाऊन
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान दक्षिण आफ्रिका संघाने येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत दमदार फलंदाजीच्या जोरावर पाकला फॉलोऑन दिला. पहिल्या डावात 615 धावा जमविल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पाकला पहिल्या डावात 194 धावांत गुंडाळले. फॉलोऑनची नामुष्की पत्करल्यानंतर पाकने दुसऱ्या डावात चहापानापर्यंत बिनबाद 80 धावा जमविल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेचा संघ आता ही मालिका एकतर्फी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. आता जून महिन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदासाठी लॉर्डस् मैदानावर लढत होईल. दक्षिण आफ्रिकेने या कसोटी मालिकेत पहिली कसोटी जिंकून पाकवर यापूर्वीच आघाडी मिळवली आहे.
या दुसऱ्या कसोटीत रिक्लेटनचे दमदार द्विशतक तसेच कर्णधार बहुमा आणि व्हेरेनी यांच्या शानदार शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 615 धावांचा डोंगर उभा केला. रिक्लेटनने कसोटीतील आपले पहिले द्विशतक (259) नोंदविले. बहुमाने 106 तर व्हेरेनेने 100 धावा केल्या. जेनसेनने 62 धावांचे योगदान दिले.
दक्षिण आफ्रिकेच्या भेदक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर पाकचा पहिला डाव कोलमडला. पाकच्या पहिल्या डावात अनुभवी बाबर आझमने एकाकी लढत देत अर्धशतक झळकाविले. त्याने 127 चेंडूत 7 चौकारांसह 58 धावा जमविल्या. मोहम्मद रिझवानने 82 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 46, सलमान आगाने 3 चौकारांसह 19, अमीर जमालने 2 चौकारांसह 15, खुर्रम शेहजादने 2 चौकारांसह 14, हमझाने 1 षटकार, 1 चौकारासह 13 धावा केल्या. उपहारावेळी पाकने 6 बाद 155 धावांपर्यंत मजल मारली होती. चहापानापूर्वीच त्यांचा पहिला डाव 54.2 षटकात 194 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडाने 55 धावांत 3 तर मापेका आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 तसेच जेनसेन आणि मुल्डेर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेने पाकवर पहिल्या डावात 421 धावांची आघाडी घेतल्याने त्यांनी पाकला फॉलोऑन दिला.
फॉलोऑन स्वीकारल्यानंतर पाकने आपल्या दुसऱ्या डावाला सावध सुरुवात करताना चहापानापर्यंत 17 षटकात बिनबाद 80 धावा केल्या. कर्णधार शान मसूद 6 चौकारांस 37 तर बाबर आझम 4 चौकारांसह 34 धावांवर खेळत आहे. पाकचा संघ अद्याप 341 धावांनी पिछाडीवर आहे. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी आहेत.
संक्षिप्त धावफलक - द. आफ्रिका प. डाव 141.3 षटकात सर्वबाद 615, पाक प. डाव 54.2 षटकात सर्वबाद 194 (बाबर आझम 58, मोहम्मद रिझवान 46, सलमान आगा 19, रबाडा 3-55, मापेका 2-43, केशव महाराज 2-14, जेनसेन 1-36, मुल्डेर 1-44), पाक दु. डाव 17 षटकात बिनबाद 80 (शान मसुद खेळत आहे 37, बाबर आझम खेळत आहे 34).
धावफलक चहापानापर्यंत