पूर ओसरला... पण पिके कुजली!
बळ्ळारी नाला परिसरातील चित्र : नव्याने पेरणी-लावणी करणेही अशक्य : ‘आता पुढे काय?’ शेतकऱ्यांपुढे प्रश्न
येळ्ळूर/प्रतिनिधी
गेल्या महिनाभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला आलेल्या पुरात जवळजवळ 15 ते 20 दिवस येळ्ळूर शिवारासह, धामणे, वडगाव, जुने बेळगाव आणि इतर परिसरातील शेकडो एकरावरील भातशेती पाण्याखाली होती. पूर ओसरला असला तरी शेकडो एकरावरील पिके कुजून मातीमोल झाली आहेत. शेतकरी खिन्न मनाने कुजलेल्या पिकाकडे व वाढलेल्या रानाकडे पहात नशिबाला दोष देत शेताकडे ये-जा करतो आहे. नव्याने पेरणी किंवा लावणी करणेही अशक्य असल्याने ‘आता पुढे काय?’ असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.
या पुरामुळे लाखो रुपयांचा फटका बसला असून आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी हतबल झाला आहे. या पूरपरिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकार कांही ठोस पावले उचलेल या प्रतीक्षेत शेतकरी आहे. एकीकडे बळ्ळारी नाल्यापासून एक दोन कि.मी.वर हिरवीगार डोलणारी पिके तर बळ्ळारी नाला परिसरात कुजून मातीमोल झालेली शेती... असे वेदारक चित्र दिसत आहे.
बळ्ळारी नाल्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असला तरी गेली अनेक वर्षे सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. पावसाळा सुरू झाला की हा प्रश्न ऐरणीवर येतो. पिके पाण्याखाली गेली की या प्रश्नांची चर्चा सुरू होते. अधिकारीवर्ग पाहणी करून आश्वासने देतात. शेतकऱ्यांना वाटते यावर्षी तरी हा जीवघेणा प्रश्न कायमचा मिटेल. पण पावसाळा संपला की ‘ना चर्चा ना पूरव्यवस्थापन’. हे चक्र गेली अनेक वर्षे असेच फिरते आहे. शेतकरी मात्र नाहक भरडला जातो आहे.
यावर्षीही पूर परिस्थिती निर्माण होताच संबंधित अधिकारी वर्गाने पूर पाहणी करून पूरग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांनी यावरील कांही उपाययोजना सांगितल्या. नेहमीप्रमाणे यावेळीही बळ्ळारी नाल्याची माहिती मागवून घेवून योग्य त्या उपाययोजना करून प्रश्न मिटविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. याबाबत पालकमंत्र्यांनीही भेटून निवेदनाव्दारे नाल्याची समस्या सांगितली. पण या प्रश्नावर सरकार दरबारी किती चर्चा होईल आणि प्रश्न निकालात काढला जाईल, हे मात्र येणारा काळच सांगेल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मात्र वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्गच नाही.