मुर्डेश्वराच्या वैभवात ‘फ्लोटींग सी वॉक’ची भर
पर्यटकांना समुद्राच्या लाटांवर पाऊल टाकायला मिळणार
कारवार : जर का कुणाला समुद्राच्या लाटांवर पावले टाकायची असतील तर त्यासाठी मुर्डेश्वर येथे नव्याने आकार घेतलेला ‘फ्लोटींग सी वॉक’ या उपक्रमाचा लाभ घ्यावा लागेल. मुर्डेश्वर, कारवार जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ. मुर्डेश्वर पर्यटनस्थळाला पृथ्वीवरील स्वर्ग असे म्हटल्यास वावगे ठरू नये आणि म्हणूनच येथे प्रत्येक दिवशी देश-विदेशातील हजारो पर्यटक दाखल होतात. मुर्डेश्वर येथे देवता आणि निसर्गदेवतेचे वास्तव्य आहे. तिन्ही बाजूने अरबी समुद्राने वेढलेल्या टेकडीवरील देवाचा थेट संबंध दक्षिण भारतामधील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकर्ण येथील आत्मलिंगाशी येत असल्याने पुरातन काळापासून मुर्डेश्वरला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अलीकडच्या काळात टेकडीवरील देवालयाच्या अवतीभवती अनेक वैशिष्ट्यापूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आल्याने, मुर्डेश्वरला भेट देण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही. कंदुकागिरी डोंगरावर साकारण्यात आलेली आणि संपूर्ण भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच म्हणून ओळखली जाणारी 123 फूट उंचीची भगवान शंकराची मूर्ती, भगवानाचे विराट दर्शन घडविते. याच टेकडीवर रामायण आणि महाभारतातील काही प्रसिद्ध कथानके शिल्पांच्या रुपाने साकारण्यात आली आहेत. देवस्थानच्या समोरील 20 मजली 203 फूट उंचीचे गोपूर ताठमानेने उभे आहे. शंकराच्या मूर्तीच्या पाठीमागील बाजूचा सनसेट पॉईंट, गोपुराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पसरलेले समुद्रकिनारे मनाला वेढ लावल्याशिवाय राहत नाहीत. स्पीड बोट, डॉल्फिन सवारीसह अन्य काही जलसाहस क्रीडा पर्यटकांना खुणावतात.
‘स्कूबा डायव्हिंग केंद्र’ कर्नाटकातील एकमेव
मुर्डेश्वरपासून काही कि. मी. अंतरावरील नेत्राणी बेटाजवळचे ‘स्कूबा डायव्हिंग केंद्र’ तर कर्नाटकातील एकमेव डायव्हिंग सेंटर आहे. आता मुर्डेश्वराच्या वैभवात ‘फ्लोटींग सी वॉक’च्या माध्यमातून आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे. समुद्राच्या लाटांवर तरंगणारा हा सदृश्य पूल 130 मीटर लांबीचा आणि साडेतीन मीटर रुंदीचा आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुलाच्या दोन्ही बाजूला रिलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटक वॉकिंग करताना जीवरक्षक मदतीला राहणार आहेत. एकावेळी 100 पर्यटक या पुलावरून पावले टाकतील. ओशियन अॅडव्हेंचर्स या खासगी कंपनीने या पुलावर सुमारे 1 कोटी रुपये इतका खर्च केला असून श्रीक्षेत्र उज्जैर येथील ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांनी या उपक्रमाचे लोकार्पण केले आहे.
कर्नाटकातील हा पहिला उपक्रम
मुर्डेश्वर येथील फ्लोटींग सी वॉक हा कर्नाटकातील पहिलाच उपक्रम मानला जात आहे. अर्थात अशा स्वरुपाचा पहिला प्रयोग कोट्यावधी रुपये खर्च करून सरकारने उडुपी जिल्ह्यातील मलपे समुद्र किनाऱ्यावर केला होता. तथापि त्या उपक्रमाचे काही तासातच विलीन झाला होता. फ्लोटींग सी वॉकचा समुद्रातील लाटांसमोर निभाव लागणार का? हे पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. तथापि हा उपक्रम मुर्डेश्वर येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांना कुतुहलकारक ठरला आहे हे निश्चित.