कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मासे मेले, माणसे मरण्याची वाट पाहता काय ?

01:04 PM Apr 07, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

गगनबावडा तालुका, धामणी खोऱ्यासह करवीर तालुक्यातील काही गावांना जीवनदायी ठरलेल्या कुंभी-धामणी नदीत मृत माशांचा खच लागला आहे. कळेसह अन्य काही गावांचे सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाले आहे. विशेषत: कळे गावातील सांडपाण्याचा नदी प्रदुषणामध्ये मोठा वाटा आहे. सांडपाणी जाणारे पुर्वीचे नैसर्गिक मार्ग खुले करून सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा देण्याची मागणी यापूर्वी कळे ग्रामपंचायतीकडून पाच महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पण प्रशासनाने हा प्रश्न गांभिर्याने घेतला नसल्यामुळे माशांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता माणसे मरण्याची वाट पाहता काय ? असा संतप्त सवाल कळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

Advertisement

कळे (ता.पन्हाळा) गावातील सांडपाणी पुर्वी ज्या ठिकाणांहून जात होते ते मार्ग संबंधित शेतकऱ्यांनी बंद केले आहेत. कळे गावात मोठी बाजारपेठ असल्यामुळे व गावातील तरंगती लोकसंख्या जास्त आहे. परिणामी सांडपाणी जास्त प्रमाणत निर्माण होते. हे सांडपाणी पुर्वीप्रमाणेच अनेक मार्गांनी गेले असते तर थेट नदीत मिसळण्याचा प्रश्न उद्धवला नसता. परिणामी नैसर्गिकरीत्या सांडपाणी जाणाऱ्या 7/12 क्षेत्रातील मार्ग खुले केले तर ग्रामपंचायतमार्फत प्रस्तावित असलेला सांडपाणी प्रकल्प उभारणे देखील सोईचे होणार असून सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे सांडपाणी जाणारे मार्ग खुले करण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन कळे ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सुमारे पाच महिन्यांपूर्वी दिले आहे.

कळे गावातील सांडपाणी पूर्वी सुमारे सहा ते सात ठिकाणाहून बाहेर पडत होते. त्यामुळे ते कुंभी-धामणी नदीत जाण्यापूर्वीच जमिनीत मुरत होते. पण गेल्या काही वर्षांपासून सांडपाणी जाणाऱ्या मार्गावर स्थानिक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी गावातील बहुतांशी सांडपाणी नाल्यातून थेट कुंभी-धामणी नदीत मिसळत आहे. नोव्हेंबर महिन्यात कळे-सावर्डे कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी अडवले आहे. अशा परिस्थितीत कळे गावातील सांडपाणी दररोज मोठ्या प्रमाणात नदीत मिसळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी प्रदुषित झाले आहे. त्यामुळे कळेसह मल्हारपेठ, सावर्डे, मोरेवाडी, सांगरुळ, मरळी, चिंचवडे, भामटे, कळंबे, आडुर, कोपार्डे आदी गावात अतिसार, काविळ आणि कॉलरा सदृश आजाराच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबतचे वृत्त ‘तरुण भारत संवाद’ने वेळोवेळी प्रसिद्ध करून पाणी प्रदुषणाची दाहकता प्रशासनासमोर आणली. त्याची गांभिर्याने दखल घेऊन कळे गावात सांडपाणी प्रकल्प तत्काळ राबविण्याच्या सूचना स्वच्छ भारत मिशनच्या जिल्हा समन्वयक माधुरी परीट यांनी कळे ग्रामपंचायतीस दिल्या आहेत. पण या प्रकल्पासाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे.

घनकचरा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जि..च्या ‘स्वच्छ भारत मिशन’ विभागाकडून दिल्या आहेत. ग्रामपंचायतीकडून ‘घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प’ आराखडा तयार केला असला तरी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सार्वजनिक स्तरावरती त्यासाठी पुरेशी जमीन उपलब्ध नाही. यामुळे गायरान जागा गट क्रमांक 71 मधील 0.53 हेक्टर क्षेत्रातील पुरेशी जागा उपलब्ध झाल्यास सांडपाणी व घनकचरा प्रकल्प उभारणे शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार गायरानमधील जागा मागणीचा प्रस्ताव कळे ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्याबाबत तातडीने निर्णय झाल्यास सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच सांडपाणी जाणारे पूर्वीचे मार्ग तातडीने खुले करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा भविष्यात पुन्हा एकदा गॅस्ट्रो, अतिसार आणि कॉलरासारख्या साथीने थैमान घातल्यास त्याचा प्रशासनावरच ताण येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article