द.आफ्रिका-ऑस्ट्रेलियाची पहिली उपांत्य लढत आज
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आज गुऊवारी येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. यावेळी अभूतपूर्व आठव्यांदा अंतिम फेरीत जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऑस्ट्रेलियाचे पारडे हे निश्चित जड राहणार आहे.
2009 पासून आतापर्यंत झालेल्या सर्व नऊ स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे. दक्षिण आफ्रिकेतील 2023 च्या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय मिळविला होता. त्याच लढतीची पुनरावृत्ती यावेळी होऊन सहा वेळा विजेत्या राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान दक्षिण आफ्रिकी महिलांना स्वीकारावे लागणार आहे.
निव्वळ आकडेवारीचा विचार करता दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियासाठी तोड ठरू शकत नाही. या दोन्ही संघांदरम्यान झालेल्या 10 टी-20 सामन्यांपैकी नऊ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. या वर्षीच्या जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एकमेव विजय नोंदला गेला. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी तर याहून अधिक मोठी आहे. कारण ऑस्ट्रेलियाने सातही सामने जिंकलेले आहेत.
सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघाचा सर्वांत चांगला भाग हा की, केवळ मेग लॅनिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती वगळता अनेक वर्षांपासून तो अबाधित राहिला आहे. 2023 च्या फायनलमध्ये खेळलेल्या इतर सर्व 10 खेळाडू येथेही दिसणार असून त्यापैकी अॅलिसा हिली, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शुट, अॅशले गार्डनर या संघाच्या आधारस्तंभ आहेत. दुबईच्या संथ खेळपट्टीवर फलंदाजीची खोली हे ऑस्ट्रेलियाचे सर्वांत मोठे बलस्थान आहे. त्यांच्या फोबी लिचफील्ड आणि अॅनाबेल सदरलँड या मोठी फटकेबाजी करण्यास सक्षम आहेत.
दक्षिण आफ्रिकेसाठी डावखुरी फिरकीपटू नॉनकुलुलेको म्लाबा ही महत्त्वाची खेळाडू असून तिने आतापर्यंत चार गट सामन्यांमध्ये 10 बळी घेतले आहेत. कर्णधार लॉरा वोल्वार्ड, तिची सलामीची जोडीदार तझनीम ब्रिट्स आणि अनुभवी मारिझान कॅप या सर्व मॅचविनर असल्या, तरी त्या नेहमीच हिली आणि कंपनीविऊद्ध कमी पडल्या आहेत.