‘धुरंधर’चा फर्स्ट लुक प्रदर्शित
निडर अवतारात रणवीर सिंह, अक्षय खन्ना खलनायकाच्या भूमिकेत
रणवीर सिंहने स्वत:चा आगामी चित्रपट ‘धुरंधर’ची घोषणा केली आहे. तर निर्मात्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लुक सादर केला आहे. रणवीरचा स्क्रीनवरील वावर दमदार असल्याचे यातूनही स्पष्ट झाले आहे. व्हिडिओत तो अत्यंत इंटेंस अवतारात दिसून येत आहे. जियो स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओजने या चित्रपटचा फर्स्ट लुक सादर केला आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ यासारखा सुपरहिट चित्रपट तयार करणाऱ्या आदित्य धरकडून दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यासारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. या चित्रपटात रणवीरची नायिका म्हणून सारा अर्जुन झळकणार आहे. सारा ही रणवीरपेक्षा 20 वर्षांनी लहान असल्याने तिच्याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये सस्पेन्स, दमदार संवाद अन् अॅक्शन दिसून येत आहे. या चित्रपटाला शाश्वतने संगीत दिले आहे. तर चित्रपटाची कहाणी अन् दिग्दर्शन तसेच निर्मितीची जबाबदारी आदित्य धरने पेलली आहे. चित्रपटाच्या निर्मितीत ज्योती देशपांडे अणि लोकेश धरने देखील योगदान दिले आहे.