For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक आयोगाची अंतिम बेरीज वादात!

06:22 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक आयोगाची अंतिम बेरीज वादात
Advertisement

राज्यात लोकसभेसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची आकडेवारी त्या त्या दिवशी सायंकाळी आणि अंतिम त्यानंतर अनुक्रमे अकरा आणि चार दिवस उशिरा जाहीर करताना मोठी तफावत दिसली आहे. पहिल्या टप्प्यात 60.22 टक्केवरून 63.71 टक्के तर दुसऱ्या टप्प्यात 59.63 वरून 62.71 टक्के सरासरी वाढ दिसत असली तरी चंद्रपूर, यवतमाळसह सत्ताधाऱ्यांना अडचणीच्या मतदार संघात पावणे सहा ते साडे सात टक्के मतदान वाढलेले दिसल्याने ही घोषणा वादात सापडली आहे. त्यात मतदार संख्याही जाहीर न केल्याने संशयात अधिकच भर पडली. आयोगाने याबद्दल ना दिलगिरी व्यक्त केली, ना खुलासा.

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध माध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखत देताना आपण पहाटे नव्हे तर दिवसाढवळ्या शपथविधी केला होता असा खुलासा करणे सुरू केले आहे. पहाटेचा शपथविधी म्हणजे चोरून काहीतरी केले असे भासू नये तर आपला सगळा कारभार खुल्लम खुल्ला असतो हे दाखवण्याचा अजितदादांचा त्यात प्रयत्न आहे. पहाटेचा शपथविधी म्हणून आमचं नाव कानफाट्या पडलं आहे... अशा रांगड्या शैलीत दादांनी आपली बाजू मांडली आहे. असंच राज्यात आणि देशात खऱ्या अर्थाने कुणाचं नाव कानफाट्या पडलं असेल तर ते निवडणूक आयोगाचं! सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम बाबत निवडणूक आयोगाच्या बाजूचा निकाल दिला असला तरी सुद्धा विरोधक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायला मागेपुढे पाहत नाहीत. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या फुटीबाबत आयोगाने घेतलेल्या भूमिकेला तर खलनायकाची भूमिका ठरवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. निवडणूक आयुक्तांनी सुद्धा आपल्यावरील आक्षेप उर्दू शायराच्या शैलित धुडकावून लावत आपल्या प्रशासकीय पोलादी चौकटीला विनाकारण वाकवण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या प्रकाराची लोकांमध्ये मात्र खूपच वाईट प्रतिमा बनत असते. 1952 सालापासून निवडणुकीचा अनुभव असणाऱ्या आयोगाला या निवडणुकीत त्यातही गतिमान संगणकीय युगात मतदान झाल्यानंतर तासाभरात निश्चित आकडेवारी जाहीर करणे अवघड राहिलेले नाही. तरीसुद्धा मतदानानंतर जाहीर झालेली आकडेवारी आणि आयोगाने जाहीर केलेली अंतिम आकडेवारी यात मोठी तफावत येण्याबरोबरच जो प्रचंड वेळ ही आकडेवारी जाहीर करण्यास घेतला गेला, त्यामुळे पुन्हा एकदा विनाकारण निवडणूक आयोग वादात सापडला आहे. खरे तर या प्रकरणी आयोगाने आता जनतेसमोर दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. दोन-चार टक्क्यांचे मताधिक्य पुढेमागे झाले तर या राज्याचा निकाल बदलू शकतो हे लक्षात घेता खरं तर अत्यंत गांभीर्याने यावर आतापर्यंत निवडणूक आयोगाकडून खुलासा आणि दिलगिरी व्यक्त होण्याची अपेक्षा होती. राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर राजकीय नेते कारणे शोधत आहेत, हे दिसून येते. त्यांना आरोप करण्याची संधी निवडणूक आयोग देत आहे.

Advertisement

देशातील इतर मोठ्या राज्यात एका किंवा दोन तारखांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली गेली. महाराष्ट्रात मात्र आयोगाने पाच टप्प्यांमध्ये मतदान घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक मतदारसंघात सभा घेण्यासाठी वेळ मिळावा आणि महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात वातावरण निर्माण झाल्यामुळे अशी रचना केल्याचा आरोप शरद पवार यांच्यापासून संजय राऊत यांच्यापर्यंत सर्व नेत्यांनी केला आहे. वैशिष्ट्या म्हणजे पंतप्रधानांनी सुद्धा 20 पेक्षा जास्त सभा घेऊन त्यांच्या आरोपांना पुष्टी दिली आहे.

मोदींनी आरोपांचा रोख बदलला

महाराष्ट्रात आल्या आल्या पंतप्रधान मोदी यांनी उध्दव ठाकरे यांच्या सेनेला नकली सेना म्हंटले. आता ते ठाकरेंवर तुटून पडतील असे वाटत होते. पण, दुसरा टप्पा संपता संपता त्यांना रोख बदलावा लागला. ठाकरे यांना जनतेतून मिळणारा प्रतिसाद त्याला कारणीभूत होता की अन्य काही कारणे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी त्यांनी शरद पवारांचा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला. त्याचा पवारांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. वास्तविक राज्याच्या एका ज्येष्ठ नेत्यांबद्दल अशा वक्तव्याचा महाविकास आघाडीने जोरदार विरोध केला पाहिजे होता. मात्र निवडणुकीची टीका म्हणून त्यांनी त्याचे भांडवल केले नाही. असा मुद्दा भाजपच्या हाती लागला असता तर त्यांनी त्यांच्या विरोधकांना सळो की पळो करून सोडले असते. भाजपच्या पारंपरिक मतदाराला मोदींनी पवारांवर टीका करून त्यातल्या त्यात सुखावले, असे म्हणायला वाव आहे. दुसऱ्या अनेक गोष्टींच्या प्रमाणेच महाराष्ट्रात भाजपचे किंवा सत्ता आघाडीचे मुख्य प्रचारक मोदी आणि शहा हेच आहेत. इतरांचा तेवढा प्रभाव दिसेना. त्याच त्या प्रकारची महायुतीच्या नेत्यांची भाषणे आणि मोदींच्या नावानेच मत मागितले जात असल्याने या नेत्यांचा स्वत:चा प्रभाव पडायचा हा काळ तसा वायाच गेला आहे. भाजपचे सगळे भले भले वत्ते गायब आहेत. गुलाबराव पाटील यांच्यासारखी तोफ शांत झाली आहे. भुजबळांनी उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती आहे असे म्हणत आपल्याच तोफेत पाणी ओतले आहे. राणे गावात गुंतून पडलेत. गडकरींच्या आजारपणाची चर्चा खूपच चालवली जात आहे. तर दुसरीकडे जयंत पाटील, संजय राऊत, नाना पटोले, सुषमा अंधारे यांच्या सभा गाजत आहेत. आदित्य ठाकरे, रोहित पवार, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, विश्वजीत कदम अशा विरोधकांत असलेल्या युवा नेत्यांच्या सभा गाजत आहेत. रोहित पाटील यांच्या भाषणात आर आर पाटील यांची झाक दिसत असल्याने लोक भावुक होत आहेत. लोकांच्या मनावर प्रभाव टाकणारे हे मुद्दे आणि सत्ताधारी आघाडीत तळमळीने, उद्वेगाने, संतापाने बोलणारे अजित पवार यांच्या सभा तेवढ्या सर्वत्र चर्चेचा विषय आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे भाषण आणि त्यांनी कुठल्या भागात कुणाला काय शब्द दिला याला फार महत्त्व निर्माण व्हायचे. यावेळी त्यांच्या त्या प्रतिमेला बराच धक्का बसला आहे. पण, फडणवीस तरीही गावोगावी जोडलेल्या माणसांना वेळ देऊन धावत्या दौऱ्यात देखील अनेकांच्या घरी भेट देऊन आपली आपली नाती जपताना दिसत आहेत. त्यांच्या शब्दाखातर सत्तेपासून दूर फेकली गेलेली भाजपमधील तसेच मित्रपक्षातील कर्ती मंडळी प्रचारात सक्रिय होऊन स्थानिक मैदान गाजवत आहेत. पण या सगळ्यात महायुतीचा एकत्रित आवाज लुप्त झाला आहे. सगळेच बंडोबा सत्तेत थंडोबा झाले की केले? याची शंका आहे. आपल्याच पोळीवर तूप ओढण्याची स्पर्धा मंत्रालयापासून मैदानापर्यंत कुठेही कमी झालेली नाही. याउलट महाआघाडीत सांगलीसारखा एखाद दुसरा  अपवाद सोडला तर लोक जीव ओतून काम करत आहेत. ही स्थिती आणि ‘ठाकरे काही माझे शत्रू नाहीत’ असे मुंबईतील लढाई सुरू होण्यापूर्वी मोदी यांनी म्हणण्याला अर्थ आहे. आता लवकरच राणे, शिंदे, राज ठाकरे अशी मंडळी उध्दव ठाकरेंवर तुटून पडतील, शेलार, वाघ, लाड, दरेकर उपमर्द करतील. चौथा आणि पाचवा टप्पा महाराष्ट्राच्या भविष्याच्या राजकारणाचा वेगळा अध्याय लिहिणारा आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत राजकारण अजून बदललेले असेल. नेतृत्वात बदल होतील की वेगळेच काही घडेल ते इथल्या जनतेच्या मतदानातून दिसणार आहे.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.