दुबईत भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगणार फायनल
दक्षिण आफ्रिकन संघ पुन्हा चोकर्स : दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा आफ्रिकेवर 50 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ लाहोर
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये विक्रमी धावसंख्या उभारणाऱ्या न्यूझीलंडसमोर दक्षिण आफ्रिकन संघ पुन्हा चोकर्स ठरला आहे. न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय साकारला आणि फायनलमध्ये प्रवेश केला. आता, दुबईत 9 मार्च रोजी भारत व न्यूझीलंड यांच्यात फायनल लढत होईल. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 362 धावांचा डोंगर उभारला होता. पण या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिकेवर न्यूझीलंडने अंकुश लावला आणि हा सामना 50 धावांनी जिंकला. डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकांत तुफानी फटकेबाजी करत नाबाद 100 धावांची खेळी साकारली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शतकी खेळी साकारणाऱ्या रचिन रविंद्राला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
द.आफ्रिका पुन्हा चोकर्स
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 363 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 9 विकेट्स गमावत 312 धावाच करू शकला. उत्कृष्ट लयीत असलेला रायन रिकल्टन 17 धावा करत बाद झाला. तर कर्णधार टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांनी चांगली भागीदारी रचली पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. बवुमाने 71 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 56 धावा केल्या आहेत. तर ड्युसेनने 66 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 69 धावांचे योगदान दिले. आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्लासेनला सपशेल अपयशी ठरला. त्याला 3 धावा करता आल्या. मॅरक्रम चांगल्या लयीत होता पण तो 31 धावा करत बाद झाला. आक्रमक फलंदाज मिलरने शेवटच्या काही षटकात तुफानी फलंदाजी करताना 67 चेंडूत 10 चौकार व 4 षटकारासह शतकी पूर्ण केले पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आफ्रिकेचे तळाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले, यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटेनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी संथ सुरुवात केली. पण लवकरच न्यूझीलंडला सुरुवातीलाच विल यंगच्या रूपाने पहिला धक्का बसला, ज्याला लुंगी एन्गिडीने आऊट केले. यानंतर, रचिन रवींद्र आणि केन विल्यम्सन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले. या दोघांनी मिळून आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करताना दुसऱ्या विकेटसाठी 164 धावांची भागीदारी केली.
रविंद्र, विल्यम्सनची तुफानी शतके
रविंद्रने वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावताना 101 चेंडूत 13 चौकार व 1 षटकारासह 108 धावांची खेळी साकारली. रचिननंतर केन विल्यम्सननेही आपले शतक पूर्ण केले. त्याने 94 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या. त्याचे हे वनडेतील 19 वे शतक ठरले. याशिवाय, विल्यम्सनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 19 हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. शतकानंतर रचिन रविंद्र 102 धावांवर रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर विल्यम्सनही 108 धावा काढून माघारी परतला. ही जोडी बाद झाल्यानंतर डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलीप्स यांनी 49-49 धावांची वादळी खेळी केली. मिचेलने 37 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकार लगावले. तर फिलीप्सने 27 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 49 धावांची खेळी केली. ब्रेसवेलने दोन दणदणीत चौकार लगावत 16 धावा फटकावल्या. यामुळे किवीज संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीतील विक्रमी धावसंख्या रचताना 50 षटकांत 6 बाद 362 धावांचा डोंगर उभा केला. आफ्रिकेकडून एन्गिडीने सर्वाधिक तीन गडी बाद केले तर रबाडाने दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 50 षटकांत 6 बाद 362 (विल यंग 21, रचिन रविंद्र 108, केन विल्यम्सन 102, डॅरिल मिचेल 49, टॉम लॅथम 4, ग्लेन फिलिप्स 49, मॅक्सवेल 16, सँटेनर 2, एन्गिडी 3 बळी, रबाडा 2 बळी).
द.आफ्रिका 50 षटकांत 9 बाद 312 (बवुमा 56, ड्युसेन 69, मॅरक्रम 31, डेव्हिड मिलर नाबाद 100, सॅटेनर 3 बळी, मॅट हेन्री व फिलिप्स प्रत्येकी दोन बळी).
न्यूझीलंडने उभारली चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वात मोठी धावसंख्या
लाहोरमध्ये झालेल्या द.आफ्रिकेविरुद्ध उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने 50 षटकांत 6 बाद 362 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडची ही चॅम्पियन्स ट्रॉफीतील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. किवीज संघाने ही कामगिरी करताना 11 दिवसापूर्वी 22 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया व इंग्लंड संघांनी केलेले विक्रम मागे टाकले.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वोच्च धावसंख्या
- 362/6 - न्यूझीलंड वि दक्षिण आफ्रिका, लाहोर, 2025 सेमीफायनल
- 351/8 - इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, लाहोर, 2025 (पराभूत)
- 347/4 - न्यूझीलंड वि अमेरिका, ओव्हल, 2017
- 338/4 - पाकिस्तान वि. भारत, ओव्हल, 2017 अंतिम सामना
केन विल्यम्सनचा धमाकेदार विक्रम
द.आफ्रिकेविरुद्ध उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू केन विल्यम्सनने 27 धावा पूर्ण करताच, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 हजार धावा करणारा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला. तर सर्वात जलद 19 हजार धावांचा टप्पा गाठणारा चौथा खेळाडू ठरला. विल्यम्सनने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 47 शतके आणि 102 अर्धशतकांची नोंद केली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हा आकडा गाठणारा विल्यम्सन हा 16 वा खेळाडू आहे. विल्यम्सनशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा रॉस टेलर आहे, ज्याने 450 सामन्यांमध्ये एकूण 18,199 धावा केल्या आहेत.