सज्जनगड येथील पायरी मार्गाखालील भराव खचला
सातारा :
सातारा तालुक्यातील परळी भागातील सज्जनगड येथील पायरी मार्गावरील गायमुख मंदिरासमोरील मारुती मंदिराच्या वरचा पायरी मार्ग लगतचा भराव ढासळला असून यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी भक्तांकडून होत आहे.
किल्ले सज्जनगड पायरी मार्गावरील गायमुख मंदिरासमोरील मारुती मंदिर आहे. या मारुती मंदिराच्या जवळचा पायरी मार्गाचा भराव ढासळला असून अजूनही भाग खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. सज्जनगड परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. गडावरून येणारे पाणी या मार्गावरून वाहत असते. हा ऐतिहासिक पायरी मार्ग आहे. इथूनच एक पायरी मार्ग परळीकडे गेला आहे. सज्जनगड पायरी मार्ग तसेच नवीन केलेल्या बसस्थानकापासूनच्या वरील बाजूचा रस्ता धाब्याचा मारुती अशा अनेक ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून थोड्या थोड्या प्रमाणात दरड कोसळणे, मातीचा भराव खचणे असे प्रकार होत आहेत. मात्र त्याची कायमस्वरूपी डागडुजी न झाल्यामुळे दिवसेंदिवस सज्जनगडचा परिसर धोकादायक होत आहे. पुरातत्त्व विभाग लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासन या सर्वांनी संयुक्तपणे सज्जनगडचा आराखडा तयार करून सज्जनगड परिसराचा विकास करणे गरजेचे आहे. गडावरील धाब्याचा मारुतीच्या पाठीमागील कडा पायरी मार्ग, नवीन केलेल्या बसस्थानकाच्या वरील रस्ता छत्रपती शिवाजी महाराज कमानीच्या पाठीमागील बुरुज अशा अनेक ठिकाणी गडाला तडे गेले आहेत. मात्र त्या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टीच केली आहे. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यामुळे सज्जनगडचा परिसर हा धोकादायक होऊ लागला आहे. गडावर दिवसेंदिवस होणारी अतिक्रमणे, प्लास्टिकचा कचरा यावर कायमस्वरूपी नसलेली उपाययोजना, गडावरील मोठमोठी बांधकामे यामुळे भविष्यात निर्माण होणारा धोका याकडे शिवभक्त, समर्थ भक्त प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.