अधिवेशनाचा पाचवा दिवसही वाया
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेच्या वर्षाकालीन अधिवेशनाचा पाचवा दिवसही विरोधकांच्या गदारोळामुळे कोणत्याही कामकाजाविना वाया गेला आहे. या अधिवेशनाचा प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत एकही दिवस कामकाज सुरळीत झालेले नाही. सातत्याने कामकाजाला स्थगिती द्यावी लागलेली आहे. शुक्रवारी पाचव्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि गोंधळ केल्याने कामकाज पुढच्या आठवड्यापर्यंत स्थगित करावे लागले आहे. पुढच्या आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी ‘सिंदूर अभियाना’वर चर्चा असल्याचे कामकाज होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी लोकसभेत प्रश्नोत्तरांचा तास पार पडल्यानंतर गोंधळ, गदारोळ आणि घोषणाबाजीला प्रारंभ झाला. राज्यसभेत तर प्रश्नोत्तरांचा तासही धड पार पडला नाही. केवळ एकच प्रश्न विचारार्थ घेण्यात येऊ शकला. सभागृहांमध्ये विरोधी सदस्यांकडून फलकही दर्शविण्यात आले. यावर सभागृहांच्या अध्यक्षांनी तीव्र आक्षेप घेतला. गोंधळ आणि शाब्दिक चकमकी यांच्यामुळे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी दोन पर्यंत स्थगित करण्यात आले. या गदारोळामुळे कोणाचा लाभ होत आहे, अशी संतप्त पृच्छा बिर्ला यांनी केली. राज्यसभेतही याच घटनाक्रमाची पुनरावृत्ती झाली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजीजू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत पुढच्या आठवड्यापासून कामकाज सुरळीत करण्यावर एकमत झाल्याचे दिसून आले. केंद्र सरकार या अधिवेशनात अनेक महत्वाची विधेयके संमत करुन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हे अधिवेशन एक महिना चालणार आहे.
