शिमग्याचा उत्सव आला... वा..वाह.. किती आनंद झाला...!
राज्यस्तरीय शिमगोत्सवाला फोंडा शहरातून उत्साहात प्रारंभ : रोमटामेळ, चित्ररथ, लोकनृत्य कलेचा सुरेख आविष्कार
प्रतिनिधी/ फोंडा
शेवत्या झाडाच्यो लांब ताळयो....लांब ताळयो...शेवती फुलल्यो कळयो...! शिमग्याचा उत्सव आला....वा..वाह..किती आनंद झाला....! गोपाळा गोपाळा...देवकीनंदन गोपाळा.! ओस्सोय...ओस्सोय...! या पारंपरिक गीतांना पदन्यासाचा ताल आणि ढोल ताशांच्या वादनाची साथ अशा उत्साहपूर्ण माहोलात अंत्रुज महालातून राज्यस्तरीय शिमगोत्सवाला दणक्यात सुऊवात झाली. पुढील पंधरा दिवस शिमगोत्सवाचा हा जल्लोष गोव्यातील सर्व तालुक्यांमध्ये चालणार आहे. तिस्क फोंडा ते जुने बसस्थानक या मार्गावऊन निघालेली ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पारंपरिक रोमटामेळ, घोडेमोडणी, धनगरनृत्य, कुणबीनृत्य अशा विविध लोकनृत्यांचा सुरेख आविष्कार आणि भव्य स्वयंचलित चित्ररथ देखाव्यांचा त्रिसंगम यंदाच्या मिरवणुकीतही खास आकर्षण ठरला. देवदेवता, संत आणि इतर वेशभूषा साकारलेल्या कलाकारांनी मिरवणुकीची रंगत वाढविली. पारंपरिक रोमटामेळांमध्ये महिला व बालकलाकारांचा लक्षणीय सहभाग या मिरवणुकीतून ठळकपणे जाणवला. वेशभूषा कलाकारांसोबत सेल्फी व मोबाईलवर फोटो घेण्यासाठी लहानमोठ्यांची गर्दी उडाली होती. गोमंतकीय कलापथकांच्या दिमतीला केरळ राज्यातील लोकनृत्य पथक तसेच आरोग्य खात्याचा क्षयरोग जागृती देखावाही पाहायला मिळाला.
सरस्वती कला मंडळ केळबाय कुर्टीचे घोडमोडणी पथक, सख्याहरी सावईवेरेचे होरबाले नृत्य, विजया कला मंडळाचे कुणबीनृत्य याशिवाय वीरभद्र, समईनृत्य अशी काही लोकनृत्य पथके या मिरवणुकीचे आकर्षण ठरली. वास्को येथील साई स्त्री शक्ती संभाजीनगर या महिला रोमटामेळ पथकाचे सादरीकरणही लक्षवेधक होते. फोंडा शहरातील या शिमगोत्सव मिरवणुकीत यंदा तब्बल सोळा रोमटामेळ, 32 छोटे मोठे चित्ररथ देखावे व तेरा लोकनृत्य पथकांनी सहभाग दर्शविला. पन्नासहून अधिक कलाकारांनी वेशभूषा साकारल्या.
पारंपरिक पेहराव व डोक्यावर रंगीबेरंगी फेटे, हातात गुड्या, चौरंग, अबदागिरे, छत्र्या, सुर्यपाने व समोर तोरण असे वाजत गाजत निघालेले भव्य रोमटामेळ हा अनोखा नजारा हजारो लोकांच्या गर्दीने अनुभवला. ढोल-ताशांचा अखंड निनाद व त्या तालावर नाचणाऱ्या तालगड्यांच्या उत्साहाला आलेले उधाण असा हा उत्साही माहोल रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मिरवणुकीची सांगता स्वयंचलित चित्ररथ देखाव्यांनी झाली. पौराणिक प्रसंगावर आधारित छोटे मोठे असे तीसहून अधिक चित्ररथ देखावे या मिरवणुकीत सहभागी झाले होते. रोमटामेळ आणि चित्ररथ देखाव्यांमध्ये चुरशीची स्पर्धा दिसून आली.
मुख्यमंत्र्यांच्याहस्ते मिरवणुकीचे उद्घाटन
मिरवणुकीचे उद्घाटन तिस्क-फोंडा येथील सर्कलजवळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष कृषीमंत्री रवी नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक, शिमगोत्सव समितीचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक रितेश नाईक, अन्य नगरसेवक तसेच समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. गावोगावीच्या पारंपरिक शिमगोत्सवाची सांगता होऊन राज्यस्तरीय सार्वजनिक शिमगोत्सवाला फोंड्यातून सुऊवात झाली आहे. गुढीपाडव्यापर्यंत विविध तालुक्यांमध्ये शिमगोत्सवाचा हा उत्साही माहोल राहणार आहे. होळी व शिमगोत्सव इतर राज्यातही साजरा होतो, पण गोव्यातील ही शिमगोत्सव मिरवणूक वैशिष्ट्यापूर्ण असून जगभरातील पर्यटकांना या उत्सवाचे आकर्षण आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी बोलताना म्हणाले. शिमगोत्सवातील रोमटामेळ व चित्ररथ स्पर्धेसाठी असलेली बक्षिसे व त्यावर होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ जुळत नसला तरी ज्या उत्साहाने हे कलाकार दरवर्षी या मिरवणुकीतून आपली कला सादर करतात त्याची तुलना होऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. शिमगोत्सव हा केवळ सर्व जाती, समाजाला एकत्र आणणारा उत्सव असून गोव्यातील या उत्सवाचे हेच वेगळपण असल्याचे मंत्री रवी नाईक म्हणाले. आनंद नाईक यांनी स्वागत केले. मनोहर भिंगी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. रितेश नाईक यांनी आभार मानले.
कलापथकांचे सादरीकरण परीक्षकांपुढेच...प्रेक्षक नाराज !
शिमगोत्सव मिरवणुकीला उशिरा सुऊवात झाल्याने फोंडा तालुक्यासह राज्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांना सुऊवातीचे काही वेशभूषा व लोकनृत्य प्रकार तेवढे पाहून घरी परतावे लागले. आयोजकांनी घाई केली तरी कलापथकांकडून वेळेत मिरवणूक सुरू करण्यास फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही. त्यामुळे रोमटामेळ व चित्ररथ पाहण्यासाठी उत्सुकतेने आलेल्या लोकांचा विशेष: लहान मुलांचा निऊत्साह झाला. काही कलापथकांनी तर प्रेक्षकांपेक्षा परीक्षक ज्या ठिकाणी बसले होते, तेथेच कला सादर करण्याचे स्वारस्य दाखविले. त्यामुळे शिमगोत्सव लोकांसाठी की, स्पर्धेसाठी असा प्रश्नही बऱ्याच जणांनी उपस्थित केला.