कुंभारीत कुख्यात गुंडाच्या टोळीची दहशत, बंदुकीचा धाक ! गावकऱ्यांनी रोखला विजापूर- गुहागर मार्ग
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील कुंभारी येथे किरकोळ कारणातून एका कुख्यात गुंडाच्या टोळीकडून पान टपरी वाल्यांसह चौघांना मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवून दहशत माजविण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांनी तब्बल दोन तास राष्ट्रीय महामार्ग रोखला. त्या टोळीला तात्काळ अटक करा, अशी मागणी करत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. अचानक घडलेल्या घटनेमुळे आणि गोळीबार झाल्याच्या चर्चेने परिसरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, जतचे पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे व पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी कुंभारी येथे भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला व त्या टोळीवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
अधीक माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास जत मधील परंतु जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या कुख्यात गुंडाची टोळीचे साथीदार व म्होरक्या कुंभारी येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पान टपरी मध्ये गुटख्याची पुढी घेतल्यावर टपरी चालकाने पैश्याची मागणी केली. त्यावर मला ओळखत नाहीस का, असे म्हणत पैसे देत नाही, म्हणतं त्याला व शेजारील तिघांना बंदुकीचा धाक दाखवत चौघांना मारहाण केली. एकाचे नाक फुटले तर दोघे किरकोळ जखमी झाले.
या घटनेनंतर टोळीने तेथून पळ काढला. या घटनेने संतप्त ग्रामस्थांनी टोळीवर कारवाई करण्यासाठी दोन तास राष्ट्रीय महामार्ग रोखला. यामुळे कुंभारी गावापासून दुरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. रात्री उशिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच जत शहरातील नाकाबंदी करण्यात आली होती. बुधवारी कुंभारी शांतता कमिटीचे देखील बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.