चूक शाळांची; धावपळ पालकांची!
विद्यार्थ्यांच्या नावाची चुकीची नोंद, पालकांना नाहक मनस्ताप
प्रतिनिधी/ बेळगाव
विद्यार्थ्यांची नावनोंदणी करताना शाळांच्या चुकीमुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कॅम्प भागातील काही इंग्रजी माध्यम शाळांनी नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नावाची नोंद न केल्यामुळे विद्यार्थ्यांना फटका बसू लागला आहे. आधारकार्डमध्ये एक तर शाळेच्या दाखल्यावर वेगळेच नाव झाल्याने नवीन आधारकार्ड तयार करून घेण्याचा अजब सल्ला शाळेकडून दिला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
कॅम्प परिसरात शिक्षण घेत असलेल्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नावामध्ये घोळ झाल्याचे समोर आले आहे. एक ना दोन तब्बल 60 विद्यार्थ्यांच्या नावात फरक केल्याने त्या सर्व पालकांना नवीन आधारकार्ड करून घेण्याचा सल्ला शाळेने दिला आहे. आधारकार्डमध्ये विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव असून शाळेच्या दाखल्यावर मात्र विद्यार्थ्याचे नाव व आडनाव इतकीच नोंद करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या सॅट्स (एAऊए) नुसार नावात फरक असेल तर शिष्यवृत्ती अथवा कोणत्याही इतर सोयीसुविधा विद्यार्थ्याला उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शाळेच्या दाखल्याप्रमाणेच आधारकार्डमध्ये दुरुस्ती करून घेण्याची सूचना शाळेकडून पालकांना करण्यात आली आहे.
आधार नोंदणी केंद्रांवर गर्दी
शाळेने आधारकार्डमध्ये दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्याने मागील दोन दिवसांपासून बेळगावमधील आधार नोंदणी केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. बेळगाव वन व पोस्ट कार्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. शाळेच्या चुकीमुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. परंतु, शाळा व्यवस्थापन चूक झाल्याचे कबूल करण्यास तयार नसून शिक्षण विभाग तसेच पालकांनाच दोषी ठरविले जात आहे.
नावनोंदणीचे अर्ज कुठे गेले?
विद्यार्थ्याला शाळेमध्ये भरती करताना अर्ज भरून घेतला जातो. त्या अर्जामध्ये पालकांनी विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव भरले आहे. काही जागरूक पालकांनी नावनोंदणी अर्जाच्या झेरॉक्स प्रत आपल्याकडे ठेवल्या आहेत. एलकेजी, युकेजींना प्रवेश घेताना जे नाव पालकांनी दिले आहे, तेच नाव पुढे सुरू ठेवणे गरजेचे असते. परंतु, शाळेच्या चुकीमुळे वडिलांचे नाव वगळण्यात आले आहे. काही पालकांनी शाळेमध्ये जाऊन नावनोंदणीचे अर्ज मागितले असता शाळेकडून टाळाटाळ करण्यात आली.
शिक्षण विभागाचाही निष्काळजीपणा
एरव्ही सरकारी शाळांमध्ये कोणतीही चूक झाल्यास धारेवर धरणारे अधिकारी मात्र इंग्रजी शाळांच्याबाबतीत बोटचेपी भूमिका घेताना दिसतात. या प्रकरणातही 60 हून अधिक विद्यार्थ्यांच्या नावात घोळ घालण्यात आला आहे. अनेकांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही शाळेची चूक नसून पालकांनीच वेळीच लक्ष देणे गरजेचे होते, असे उत्तर देण्यात येत असल्याने शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त होत आहे.