जगातील सर्वात स्थुल कैदी
300 किलो आहे वजन, देखभालीत दररोज 1 लाख रुपयांचा खर्च
तुरुंगात कैद्यांवर सरकारला मोठा खर्च करावा लागतो. ऑस्ट्रियात एका कैद्यावर सरकारला तो केवळ अत्यंत स्थुल असल्याने अधिक रक्कम खर्च करावी लागत आहे. हा कैदी 300 किलोच्या आसपास वजनाचा असल्याने त्याच्या देखभालीत अत्यंत मेहनत आणि खर्च होत आहे. ऑस्ट्रियाच्या न्याय विभागासमोर 29 वर्षीय एक असा कैदी आला आहे, ज्याचे वजन सुमारे 300 किलो आहे आणि त्याच्या देखभालीवर सरकारला सामान्य कैद्याच्या तुलनेत दहापट अधिक खर्च करावा लागत आहे. हा इसम अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तुरुंगात आला आहे. पोलिसांनी त्याच्या घरावर छापे टाकला असता तेथे 45 किलो गांजा, 2 किलो कोकेन, सुमारे 2 किलो अम्फेटामिन आणि 2000 हून अधिक एक्सटेसी टॅबलेट्स हस्तगत झाले होते.
या इसमाला व्हिएन्ना येथील जोसेफस्टाट तुरुंगात ठेवण्यात आले, परंतु तेथे बेड तुटण्याच्या स्थितीत पोहोचला. यामुळे त्याला व्हिएन्नापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावरील कोर्नेउबर्ग तुरुंगात हलविण्यात आले. या कैद्याचे वजन सुमारे 289 किलो असून त्याची सुरक्षा आणि सुविधेसाठी एका विशेष स्वरुपात वेल्ड करण्यात आलेला मजबूत बेड तयार करण्यात आला आहे. याचबरोबर नर्स त्याला दिवसरात्र देखभाल प्रदान करतात. त्याच्या देखभालीवर दररोज सुमारे 1800 युरोचा खर्च येतो. तर सामान्य कैद्यावर हाच खर्च सुमारे 180 युरो आहे.