अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे भाग्य उजळले
बेळगाव : हलगा येथील सुवर्णविधानसौधमध्ये दि. 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने शहरातील खराब रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रभाग क्रमांक 27 मध्ये येणाऱ्या विविध भागात रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात आले. त्यामुळे सदर काम दर्जेदार व्हावे यासाठी नगरसेवक रवी साळुंखे यांनी स्वत: थांबून चांगल्या प्रकारे काम करण्याची सूचना केली.
दरवर्षीप्रमाणे यंदादेखील सुवर्णविधानसौधमध्ये कर्नाटक सरकारचे विधिमंडळ अधिवेशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. मंत्री महोदय व अधिकारी तब्बल 15 ते 20 दिवस बेळगावात वास्तव्यास असणार असल्याने त्यांच्या दौऱ्यावेळी कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
पथदीपही दुरुस्त
गेल्या अनेक दिवसांपासून बंदस्थितीत असलेले पथदीपही दुरुस्त केले जात आहेत. रस्त्यावर खड्डे पडलेल्या ठिकाणी डांबर घालून पॅचवर्क केले जात आहे. प्रभाग क्रमांक 27 मधील बसवेश्वर सर्कल, आंबेडकर सर्कल आणि गाडेमार्ग शहापूर या ठिकाणच्या रस्त्याचे सोमवारी पॅचवर्क करण्यात आले. त्यामुळे नगरसेवक रवी साळुंखे यांनी स्वत: थांबून चांगल्या प्रकारचे काम करण्याची सूचना संबंधित ठेकेदार व कामगारांना केली.