अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्णचे भवितव्य टायब्रेकरमध्ये ठरणार
वृत्तसंस्था/ पणजी
गोव्यात चालू असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या फेरीत कठीण स्थितीत सापडल्यानंतर पी. हरिकृष्णने सामना बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले. अर्जुन एरिगेसी आणि आर. प्रज्ञानंद यांनीही आपापले सामने बराबरीत सोडविले. त्यामुळे या तिघांच्याही भवितव्याचा निकाल आता टायकब्रेकरमध्ये लागणार आहे.
अर्जुनने हंगेरीच्या अनुभवी ग्रँडमास्टर पीटर लेकोविऊद्ध पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळताना 36 चालींनंतर बरोबरी स्वीकारली, तर प्रज्ञानंदने ग्रँडमास्टर डॅनिल दुबोव्हविऊद्ध 30 चालींनंतर गुण विभागणे पसंत केले. हरिकृष्णने देखील 38 चालींनंतर सामना बरोबरीत सोडविला. चौथ्या फेरीत खेळणाऱ्या पाच भारतीयांपैकी अर्जुन आणि प्रज्ञानंद यांच्यावर सर्वांच्या नजरा होत्या.
दुसरीकडे, बुधवारी बुद्धिबळ विश्वचषकातून दोन भारतीय बाहेर पडले. पण व्ही. प्रणव आणि कार्तिक वेंकटरमण हे दोघेही ताठ मानेने परतू शकतील. कारण त्यांना अनुक्रमे उझबेकिस्तानचा नोदिरबेक याकुबबोएव्ह आणि व्हिएतनामचा ले क्वांग लिम या बलाढ्या प्रतिस्पर्ध्यांनी पराभूत केले. त्यांनी 32 खेळाडूंच्या फेरीत पोहोचताना खूप चांगली कामगिरी केली. प्रणवने 60 वा मानांकित खेळाडू म्हणून आणि कार्तिक 109 वा मानांकित खेळाडू म्हणून सुरुवात केली होती. काळ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळणारा जागतिक कनिष्ठ विजेता प्रणव याकुबबोएव्हविऊद्ध दुसऱ्या गेममध्ये 38 चालींत पराभूत झाला. कार्तिकलाही लिमविरुद्ध जोरदार झुंज दिल्यानंतर पराभूत व्हावे लागले.
मंगळवारी काळ्या सोंगाट्यांसह विजय मिळविणारा ग्रँडमास्टर जोस एदुआर्दो मार्टिनेझ आल्कांतारा याने 20 चालींमध्ये ग्रँडमास्टर अॅलेक्सी सरनाविऊद्धचा सामना बरोबरीत सोडविल्यानंतर तो 16 खेळाडूंच्या फेरीत पोहोचणारा पहिला खेळाडू ठरला. आता त्याचा सामना ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण आणि स्वीडनचा ग्रँडमास्टर निल्स ग्रँडेलियस यांच्यातील विजेत्याशी होईल. दोन वेळचा विजेता ग्रँडमास्टर लेव्हॉन अॅरोनियननेही पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने ग्रँडमास्टर रॅडोस्लाव्ह वोज्टास्झेकविऊद्ध 35 चालींमध्ये दुसरा गेम बराबरीत सोडविला.