जोरदार वळिवाने शेतकरी वर्ग सुखावला
उचगाव परिसरात पावसामुळे शेतवडीत साचले पाणी : पिकाचे नुकसान
वार्ताहर/उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागात तसेच उचगाव परिसरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमाराला वळीव पावसाने जोरदार झोडपून काढले. मुसळधार वृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. शेतवडीमध्ये पाणी साचल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. तर पश्चिम भागामधील शेवटच्या अंतिम टप्प्यातील आंबे, काजू, बागायतदारांचेही मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत होते. मंगळवारी उष्णतेचे प्रमाण वाढले होते. सायंकाळी चारच्या सुमाराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तसेच शेतवडीतील झाडांच्या अनेक फांद्या वाऱ्याच्या तडाख्याने कोसळल्याचेही चित्र दिसून येत होते. गावागावातून ग्राम पंचायतीनी अद्याप गटारींची स्वच्छता न केल्याने सर्वत्र पाणी तुंबून अनेक ठिकाणी पाणी शिरल्याचे चित्र दिसून येत होते.
या भागात हा पाचव्यांदा वळिवाचा जोरदार पाऊस झाला. मात्र अद्याप ग्राम पंचायतींना जाग आली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केल्याचेही बोलले जात आहे. शेतकरी वर्ग मशागतसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच पावसाने सर्वत्र झोडपून काढले. शेतवडीत असलेल्या ऊस आणि भाजीपाला पिकांना पावसाने जीवदान दिले आहे. या भागात पाचव्यांदा पाऊस झाल्याने जमिनीची मशागत करण्यासाठी आता शेतकरी वर्गाला सोपे झाले आहे. याचबरोबर शेतवडीत असलेल्या मिरची व इतर भाजीपाला पिकांनाही हा पाऊस वरदान ठरल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. तरी पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे मिरची पिकाला हा पाऊस थोडा मारक ठरल्याचीही चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे.