कामगारांच्या हस्ते माणगंगा कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ
शेतकऱ्यांमध्ये उत्साह: तीन तालुक्यातून तानाजी पाटील यांचा गौरव
आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडीतील माणगंगा साखर कारखान्याच्या ३२व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कामगारांच्या हस्ते करण्यात आला. अनेक वर्षे बंद कारखाना संचालक मंडळासोबत कष्ट घेत अवघ्या तीन महिन्यात गाळपासाठी सज्ज केल्याने कामगारांच्याहस्ते मोळीपुजन करून आगळावेगळा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
आटपाडी येथे माणगंगा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम कारखान्याचे कामगार सुधाकर इनामदार, बबन जाधव, शहाजी पाटील, आप्पा मोरे, मधुकर चव्हाण, विलास लवटे, बाळु जावीर, पोपट पुजारी, भारत पळसे यांच्याहस्ते व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. माणगंगा कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील, उपाध्यक्ष ब्रम्हदेव होनमाने, प्र. कार्यकारी संचालक एन. एम. मोटे, डी.एम.पाटील, साहेबराव चवरे, सुबराव पाटील, दत्तात्रय पाटील, रमेश कातुरे, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, अमोल मोरे, हणमंत पाटील, पृथ्वीराज पाटील, अरविंद चव्हाण, साहेबराव पाटील, धनाजी खिलारी, रोहन पाटील, ज्ञानुमाऊली जाधव, मधुकर माळी, श्रीरंग शिंदे, संपत पाटील, गणेश खंदारे, शहाजी जाधव, आर. डी. चव्हाण यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अथक परिश्रमाने कारखाना सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
माणगंगा साखर कारखाना अनेक वर्षे बंद होता. थकीत कर्जापोटी हा कारखाना जिल्हा बँकेने ताब्यात घेतला. त्यानंतर झालेल्या कारखाना निवडणुकीत नाट्यपुर्ण घडामोडी घडत बिनविरोध सत्तांतर झाले. त्यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी हा बंद कारखाना सभासदांचाच ठेवणार आणि येणाऱ्या गळीत हंगामात तो सुरू करणार, असा शब्द सभासदांना दिला होता.
त्याअनुषंगाने कारखाना आणि बँकेत करार झाला. गत तीन महिने अहोरात्र काम करत अनेक अडचणीतुन वाटचाल करत कारखान्याची दुरूस्ती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील व कर्मचाऱ्यांनी घेतले. बॉयलर अग्निप्रदिपन सोहळ्यावेळी माणगंगा साडेतीन लाख मे. टन ऊसाचे गाळप करण्यासाठी सज्ज असल्याचे तानाजीराव पाटील व संचालक मंडळाने स्पष्ट केले.
कारखाना सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांनीही प्रामाणिकपणे साथ दिल्याने त्यांच्याहस्ते गळीप हंगामाचा शुभारंभ करत तानाजीराव पाटील व सहकाऱ्यांनी गाळपाचे वेगळेपण जतन केले. या सन्मानाबद्दल कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तर शेतकऱ्यांनी कारखाना सुरू करण्याचे आव्हान तानाजीराव पाटील व सहकाऱ्यांनी पेलल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
माणगंगा सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आम्ही अहोरात्र कष्टाने पुर्णत्वास नेली आहे. आत्ता हा कारखाना चालविण्यासाठी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी माणगंगा साखर कारखान्याला ऊस घालुन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी केले. याप्रसंगी संचालक, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुकदार, सभासद उपस्थित होते.