For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाशक्तीचे पतन...

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाशक्तीचे पतन
Advertisement

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा झालेला पराभव हा धक्कादायक असला, तरी अनपेक्षित म्हणता येणार नाही. महाराष्ट्रात मागच्या दोन ते अडीच वर्षांत भाजपाने वेगवेगळ्या माध्यमातून जो उन्माद केला, त्याचेच हे फलित मानावे लागेल. त्यामुळे यातून भाजप बोध घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे असेल. राज्यात महाविकास आघाडीने मिळविलेला विजय तसा देदीप्यमानच ठरावा. काँग्रेस 13, ठाकरेसेना 9 व शरद पवार गटाने 8 जागा पटकावत तब्बल 30 जागा खेचून आणल्या. तर दुसरीकडे महाशक्तीमान युतीची मजल केवळ 17 जागांपर्यंतच सीमित राहिली. त्यात भाजप 9, शिंदे गट 7, तर दादा गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. मागच्या निवडणुकीत 41 जागा मिळविणाऱ्या महायुतीची इतकी घसरण होण्यास बरेच पॅक्टर कारणीभूत ठरलेले दिसतात. त्यातला पहिला महत्त्वाचा पॅक्टर म्हणजे फोडाफोडी व त्यातून तयार झालेले नरेटिव्ह होय. भाजपाने आधी शिवसेनेत फूट घडवली. उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांचा पक्ष, चिन्ह सारे काही हिरावून घेण्यात आले. यातून भाजपची व पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची नकारात्मक प्रतिमा तयार झाली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ही प्रतिमा अधिकच गडद बनली. ही नकारात्मकता महायुतीला शेवटपर्यंत दूर करता आली नाही. त्यामुळेच पक्ष फोडाफोडी, केवळ विरोधकांवरील कारवाईचा बडगा, ब्लॅकमेलिंग अशा गोष्टींबद्दल लोकांनी मतदानयंत्रातून राग व्यक्त केल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दल जनमानसात निर्माण झालेली सहानुभूतीही हाही यातील महत्त्वाचा घटक ठरावा. ठाकरे यांनी तर महाविकास आघाडीचे नेतृत्व करताना मोदींना आव्हान देण्याची धमक दाखविली. त्यामुळे त्यांचे यश हे जागेपलीकडचे ठरते. दुसरीकडे ठाकरेंचा उल्लेख नकली संतान असा करणे, तर शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल भटकती आत्मा असे संबोधन वापरणे शीर्षस्थ नेतृत्वास भोवले. मुंबई, बारामतीसह इतर भागातील निकालातून हेच ध्वनित होते. मुंबईतील घाटखोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर या भागातील पंतप्रधानांचा रोड शो रद्द करण्याची भूमिका मुंबई भाजपाने घ्यायला हवी होती. प्रत्यक्षात मुंबईत रोड शो घेऊन येथे अभूतपूर्व वाहतूक कोंडीद्वारे मुंबईकरांना नाहक मनस्ताप देण्यात आला.  त्याचा परिणाम ईशान्य मुंबईसह इतर मतदारसंघातही झाल्याचे दिसून येते.  याशिवाय मराठवाड्यासह अन्य काही भागांत जरांगे पॅक्टरही निर्णायक ठरल्याचे पहायला मिळते. सुऊवातीला जरांगे यांचे आंदोलन व्यवस्थित हाताळण्यात आले. मात्र, नंतर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करण्याच्या गोष्टी केल्या गेल्या. स्वाभाविकच बीड, परभणी, जालना, लातूर, नांदेड अशा जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये जरांगे यांना दुखावण्याची किंमत महायुतीला मोजावी लागली. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, महादेव जानकर अशा दिग्गजांनाही याचा फटका बसला. भविष्यात संवेदनशील विषय नाजूकपणे हाताळण्याचे कौशल्य महायुतीतील नेत्यांना दाखवावे लागेल. कांदा निर्यात बंदीचा मुद्दाही भाजपसाठी तापदायक ठरल्याचे दिसते. या मुद्द्यावर केंद्र सरकारने घातलेला घोळ धुळे, नाशिक, दिंडोरी येथे चांगलाच महागात पडला. केंद्रीय मंत्री भारती पवार, डॉ. सुभाष भामरे यांनाही त्यामुळेच पराभव पत्करावा लागल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होते. अतिआत्मविश्वास हेही महायुतीच्या पराभवाचे आणखी एक कारण. एकीकडे देशात चारसो पारचा नारा दिला जात असताना महाराष्ट्रात 45 पारच्या वल्गना केल्या गेल्या. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांचे उन्मादी राजकारणही या साऱ्यास जबाबदार ठरले. सतत उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याची खेळी त्यांच्यावरच बूमरँग झाली, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात संविधान बदलाचा मुद्दा हिरिरीने मांडला. झोपडपट्टी परिसरात अतिशय परिणामकारकपणे हा विषय पोहोचविण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. त्यामुळे मागच्या वेळी केवळ एका जागेपुरती सीमित राहिलेली काँग्रेस 13 वर पोहोचू शकली. कालपरवापर्यंत काँग्रेस संपली, असेच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना वाटत होते. परंतु, कोणताही पक्ष सहजासहजी संपत नसतो, हे संबंधितांनी ध्यानात घेतले पाहिजे. केवळ विरोधी पक्षातील नेत्यांनाच टार्गेट करणे, त्यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावणे, विरोधकांची आर्थिक नाकेबंदी करणे, यावर सत्ताधाऱ्यांकडून एकीकडे भर दिला गेला. तर दुसऱ्या बाजूला पक्ष प्रवेश झाल्यानंतर मात्र, पक्षबदलूंच्या चौकशा थांबविण्यात आल्या. यातून तयार झालेली नकारात्मकताही युतीच्या पतनास कारणीभूत ठरली. त्यामुळे यापुढे अशा दबावतंत्री राजकारणाबाबतही पुनर्विचार करावा लागेल. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेले उद्योग, मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव, यांसारख्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेला भर, मोदींच्या प्रत्येक विधानाला दिलेले तोडीस तोड उत्तर, हादेखील एक महत्त्वाचा पैलू म्हणता येईल. ठाकरे यांनी आपले हिंदुत्व हे कसे सर्वसमावेशक आहे, हेही सातत्याने पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मूळ मतदारासोबत मुस्लिम व दलित मतेही वळविण्यात ते यशस्वी ठरले. त्यांच्या चार जागा तर अगदीच थोडक्यात गेल्या. त्यामुळे खरी शिवसेना कुठली, याचे उत्तर ज्याचे त्याला कळले असावे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव भाजपाने खेळला खरा. पण, त्याने त्यांची सर्वांत हानी झाली, असे म्हणता येईल. त्याऐवजी फडणवीस वा पक्षातील अन्य कुणाला मुख्यमंत्री केले असते, तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा बरोबर उपयोग करीत 7 जागांपर्यंत मजल मारली. त्या अर्थी भाजपची खेळी अंगलट आली, हे नक्की. खरेतर कुठल्याही निवडणुकीत सर्वसामान्यांच्या जगण्यामरण्याच्या प्रश्नांवर भर हवा. मात्र, केवळ ध्रुवीकरणावर अवलंबून राहण्याची खोड भाजपाला नडली, असे म्हणता येईल. यातून योग्य तो धडा घेतला, तरी भाजपाचा मार्ग भविष्यात बऱ्यापैकी सुकर होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.